Parbhani NCP Politics News : माजी आमदार आणि अजित पवार यांचे विश्वासू अशी ओळख असलेले पण पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांची साथ देणारे विजय भांबळे यांनी नुकताच अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला. मुंबईत अजित पवारांनी विजय माझा जुना सहकारी आहे, असे म्हणत भांबळे यांचे पक्षात स्वागत केले. दुसरीकडे पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पक्ष प्रवेशाला मात्र अद्याप अजित पवारांकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. विजय भांबळे यांच्या पक्षप्रवेशाने जिंतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा बळ मिळणार आहे.
परभणी (Parbhani) जिल्ह्यातील राजेश विटेकर, विजय भांबळे हे दोन तरुण नेते अजित पवार यांच्या खास विश्वासातले म्हणून ओळखले जायचे. परंतु राज्यात जेव्हा राष्ट्रवादी पक्षात फूट पडली तेव्हा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी, नेत्यांनी मोठ्या साहेबांची म्हणजे शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र अनेक जुन्या सहकाऱ्यांनी अजित पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेत शरद पवारांची साथ सोडली.
यापैकीच एक म्हणजे जिंतूर तालुक्यातील तरुण नेते विजय भांबळे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भांबळे यांचा जेव्हा अवघ्या तीन हजार सातशे मतांनी भाजपकडून पराभव झाला होता, तेव्हा अजित पवार (Ajit Pawar) कमालीचे नाराज झाले होते. मतदारसंघातील कामासाठी एका कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन केला तेव्हा त्यांनी तुम्ही चांगल्या माणसाला निवडून देत नाही, विजय भांबळेला पाडला, असे म्हणत सुनावले होते.
2024 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांनी भाजप-महायुतीच्या मेघना बोर्डीकर यांना चांगली टक्कर दिली. परंतु त्यांचा साडेचार हजार मतांनी पराभव झाला. दरम्यान, मराठवाड्यातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी पक्ष सोडून अजित पवारांच्या पक्षात दाखल झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता विजय भांबळे यांनीही शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
अजित पवार यांनी भांबळेंच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करताना विजय भांबळे हा माझा जुनाच सहकारी आहे, आम्ही विधानसभेत सोबत काम केले. तो विकासकामे करण्यासाठी नेहमीच ॲग्रेसिव्ह असतो, असे म्हणत त्यांचे कौतुक केले. पराभावाने खचून न जाता जनतेची कामे करण्यासाठी परत नव्याने कामाला लागा व पक्षाची ध्येय-धोरणे सर्वांपर्यंत पोचवा, असे आवाहन अजित पवारांनी भांबळे व त्यांच्या समर्थकांना केले. भांबळे यांच्या प्रवेशाने मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.
मतदारसंघातील बोर्डीकर, भांबळे गटाचा संघर्ष जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता महायुतीतील घटक पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुना संघर्ष विसरून बोर्डीकर-भांबळे यांना सोबत काम करावे लागणार आहे. विजय भांबळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे, तर दुसरीकडे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पुर्वनियोजित पक्ष प्रवेशाला मात्र अद्याप मुहूर्त लागलेला नाही. अजित पवारांनी त्यांना वेटिंगवर ठेवल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.