
Parbhani NCP Politics : पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची तयारी पूर्ण केली होती. मार्च महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या दुर्राणी यांनी अडीच महिन्यातच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र दूर्राणी यांच्या या धरसोड वृत्तीमुळे अजित पवार यांनी त्यांना तूर्तास तरी दूरच ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
दुर्राणी यांनी दावा केल्यानुसार आठ जून रोजी त्यांचा पक्षप्रवेश अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पाथरी येथे होणार होता. मात्र या प्रवेश सोहळ्याच्या तयारीत असलेल्या दुर्राणी यांना दोन दिवस आधी अजित पवारांकडून दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्या समर्थकांच्या आनंदावर विरजण पडले. शिवसेना शिंदे गटाचे सईद खान यांनी दुर्राणी यांच्यासमोर पाथरीमध्ये मोठे आव्हान उभे केले आहे.
त्याला शह देण्यासाठी विरोधी पक्षात न राहता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय दुर्राणी यांनी घेतला होता. सुरुवातीला अजित पवारांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवत पाथरीत येण्याचे मान्य केले. सईद खान यांना रोखण्यासाठी दुर्राणी यांनी अजित पवारांचे लाडके आमदार राजेश विटेकर यांच्याशी असलेले मतभेद संपवून जुळवूनही घेतले. मात्र दुर्राणी (Babajani Durani) यांची तळ्यात मळ्यात असलेली भूमिका पाहता दोन महिन्यातच पुन्हा त्यांची घरवापसी होणे पक्षाच्या दृष्टीने हिताचे ठरणार नाही, या विचारातून दुर्राणी यांना तूर्तास प्रवेश नाकारण्यात आल्याची चर्चा आहे.
दुर्राणी समर्थकांनी हा प्रवेश लवकरच होणार असल्याचे सांगत अजूनही आपण आशावादी असल्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या बाबाजानी दुर्राणी यांच्या अडचणी वाढल्या होत्या. दरम्यानच्या काळात नगर परिषदेतील कर्मचारी तसेच शिंदेसेनेचे माजी नगरसेवक यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. याशिवाय नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील बाबा टॉवरच्या गैरकारभाराची एसआयटी चौकशी सरकारने जाहीर केली होती.
अशावेळी दुर्राणी यांना पक्षप्रवेश दिला तर प्रतिमा खराब होऊ शकते, असा मतप्रवाह पक्षात दिसून आला. दुर्राणी हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र लांबलेल्या पक्षप्रवेशाने त्यांच्या या प्रयत्नावर पाणी फिरले आहे.
बाबाजानी दुर्राणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार की नाही? यावर सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. तर त्यांचे समर्थक अजित पवार यांच्याकडून पक्षप्रवेशासाठी तारीख कधी मिळते याकडे लक्ष ठेवून आहेत. आता अजित पवाराकडून दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.