Congress Politics sarkarnama
मराठवाडा

Congress news : काँग्रेसला धक्का; उद्धव सेना- भाजपचे प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य

Fulambri Nagar Panchayat Setback for Congress: उपनगराध्यक्षपदावर काँग्रेसचे वर्चस्व कायम असले तरी स्वीकृत सदस्यांच्या निवडीमुळे नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. या सर्व घडामोडींकडे फुलंब्रीकरांचे लक्ष लागले होते.

नवनाथ इधाटे

Phulambri municipal council election: फुलंब्री नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्य निवडीमध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली असून या प्रक्रियेत काँग्रेसला धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व भाजप यांनी प्रत्येकी एक-एक स्वीकृत सदस्य मिळवत आपली ताकद वाढवली आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनोज मुळे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आसेफ पटेल यांची या पदावर वर्णी लागली आहे.

फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबर रोजी झाली होती. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्षासह सात नगरसेवक निवडून आले होते. तर भाजपचे पाच, काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक नगरसेवक विजयी झाला होता.

सोमवारी पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. यामध्ये निवडणूकीपूर्वी नगरपंचायतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस व भाजप अशा तीन पक्षाचे गट स्थापन करून तिन्ही पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यात आली होती. यामध्ये नगराध्यक्षांसह आठ सदस्यांचा शिवसेना (उबाठा) गट हा सर्वात मोठा ठरला.

या गटाचा गटनेता अर्चना दुतोंडे , काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सदस्याला सोबत घेत पाच सदस्यांचा दुसरा गट स्थापन करून गटनेते काँग्रेसचे जमीर पठाण तर भाजपनेही पाच सदस्यांचा स्वतंत्र तिसरा गट तयार करून योगेश मिसाळ यांची गटनेता म्हणून निवड केली होती.

गटसंख्येनुसार शिवसेना (उबाठा) गटाचा एक स्वीकृत सदस्य निश्चित मानला जात होता. त्यानुसार ॲड.आसेफ पटेल यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. मात्र दुसऱ्या स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी पाच-पाच सदस्य असल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला.

अखेर नियमानुसार पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस व भाजप यांच्यात ईश्वर चिठ्ठी टाकून निवड प्रक्रिया पार पडली. या चिठ्ठीत नशिबाने भाजपच्या बाजूने कौल दिल्याने भाजपचे मनोज मुळे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. या निकालामुळे स्वीकृत सदस्य निवडीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजप व शिवसेना (उबाठा) यांनी प्रत्येकी एक-एक स्वीकृत सदस्य मिळवला आहे.

उपनगराध्यक्षपदावर काँग्रेसचे वर्चस्व कायम असले तरी स्वीकृत सदस्यांच्या निवडीमुळे नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. या सर्व घडामोडींकडे फुलंब्रीकरांचे लक्ष लागले होते.

ईश्वर चिठ्ठीत भाजपचे यश

2017 नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडे एमआयएमसह 12 नगरसेवक होते. त्यावेळी भाजपने अ आणि ब असे दोन गट स्थापन करून दोन स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले होते. मात्र यावेळेस परिस्थिती उलटी झाली आहे. भाजपकडे केवळ पाच तर महाविकास आघाडीकडे नगराध्यक्ष व 12 नगरसेवक आहेत. मात्र यावेळेस भाजपचे गटनेते योगेश मिसाळ यांनी राजकीय खेळी करीत भाजपचा पाच सदस्यांचा गट स्थापन केला. काँग्रेसनेही पाचच सदस्यांचा गट निर्माण केल्याने दोन्ही गटाचे सदस्य बराबरीने झाले.

र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगराध्यक्षसह आठ जणांचा गट स्थापन केला. ईश्वरचिठ्ठीत भाजपला यश मिळाल्याने गटनेते योगेश मिसाळ यांच्याकडून त्यांच्या गटात मनोज मुळे हे स्वीकृत सदस्य सहभागी झाले आहेत.

महाविकास आघाडीच्या पाच सदस्यांना ब्रेक

महाविकास आघाडीचे 12 नगरसेवक व एक नगराध्यक्ष असे निवडून आले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी पदभार स्वीकारता वेळेस दोन गट स्थापन करून दरवर्षी दोन स्वीकृत सदस्य घेणार असल्याचे सांगितले होते. असे पाच वर्षात तब्बल 10 नगरसेवक केले जाणार होते. मात्र आता भाजपचे गटनेते योगेश मिसाळ यांच्या पारड्यात एक स्वीकृत नगरसेवक गेल्याने महाविकास आघाडीतून मागच्या दाराने येणाऱ्या पाच सदस्यांना ब्रेक लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT