विजय देऊळगावकर
Chhatrapati Sambhjinagar News : छत्रपती संभाजीनगर शहराचे शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती येथे नेत्यांच्या हस्ते महाआरती करून शहरातील गणेश उत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संस्थानच्या ट्रस्टींनी मंदिराच्या विकासकामासाठी मदतीची मागणी केली. यावेळी निधी कमी पडणार नाही, असे आश्वासन देताना नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न केलाच. कोपरखळ्या आणि टोलेबाजीमुळे गणेशोत्सवाच्या व्यासपीठालाही राजकीय स्वरूप प्राप्त झाले होते.
संस्थान गणपतीची महाआरती करण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट, (Sanjay Shirsat) ओबीसी मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, भागवत कराड, कल्याण काळे, माजी खासदार चंद्रकांत खैरै, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. महाआरतीनंतर संस्थान गणपती ट्रस्ट कार्य अहवालाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मदतीची मागणी अन् निधीची घोषणा
यावेळी संस्थानचे पदाधिकारी नंदु घोडेले यांनी मंदिराचे बांधकाम करण्यात येणार असून लोकप्रतिनिधींकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खासदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी तात्काळ खासदार निधीतून आता 25 लाख आणि मार्च महिन्यानंतर 25 लाख रुपये मंदिरासाठी निधी देण्याची घोषणा केली. तर मंत्री अतुल सावे यांनी देखील हा माझा मतदार संघ असून सांगाल तेवढा निधी देण्याचा शब्द दिला. मग पालकमंत्री शिरसाट यांनी देखील निधीची कमी पडणार नाही, मी पालकमंत्री आहे असे म्हणत कुरघोडी केली.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात शिरसाट, भुमरे यांचा उल्लेख करताना माझे जुने सहकारी आताचे नाही, असा चिमटा काढला. तर पालकमंत्री शिरसाट, भुमरे यांनी आमचे मार्गदर्शक खैरै साहेब असे म्हणत त्यांनाही मान दिला. तर शिरसाट यांनी भागवत कराड यांचा खैरै साहेबांच्या जवळचे कराड साहेब, त्याच प्रमाणे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचे आगमन झाल्यानंतर खैरै साहेबांच्या जवळचे दानवे साहेब, असा टोला लगावला.
मंत्री सावे यांनी देखील आपल्या भाषणात पालकमंत्री शिरसाटांचा उल्लेख माझे काका असा करत त्यांनी माझ्या वडीलांसोबत काम केले असल्याचे सांगितले. राज्य शासनाने गणपती उत्सव हा राज्याचा सण म्हणून जाहीर केला आहे. यासाठी 18 कोटींचे बजेट मंजूर केले असल्याचे सावे यांनी खैरे यांच्याकडे बघत सांगीतले. तर पालकमंत्री शिरसाट यांनी आपल्या भाषणात पक्ष किंवा चिन्ह कोणतेही, असो मात्र आम्ही सार्वजनिक कार्यासाठी एकत्र येतो.
सणांसाठी तडजोडी नको, सर्व सूचनांची अंमलबजावणी, प्रत्येकाने काही अनुचीत घटना होणार नाही यासाठी आपले भाग सांभाळावेत. पक्ष विरहीत मिरवणूक झाली पाहीजे, असे आवाहन केले. तसेच संस्थान गणपती ट्रस्टच्या मदतीबाबत बोलताना मी पालकमंत्री आहे, खासदार भुमरे आणि मंत्री सावे यांनी निधीची घोषणा केली आहे. ते पत्र मीच मंजूर करणार आहे, असे सांगत मंदिराच्या बांधकामच्या वेळी आपसात भांडू नका, गोंधळ बाजूला ठेवा, कुरबुर टाळल्या पाहिजे, असा सल्ला शिरसाट यांनी व्यासपीठावरील नेत्यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.