Beed News: गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन व इतर भागातून अवैध वाळू उपसा केला जात आहे. स्वतः गेवराईचे तहसीलदार यांच्या उपस्थितीत हे सर्व सुरू आहे. शंभर कोटीहून अधिकची हजारो ब्रास वाळू माफियांकडून काळ्या बाजारात विकण्यात आली. याचे पुरावे, माहितीसह आम्ही जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी नेमलेल्या चौकशी समितीत आमचे आरोप खरे सिद्ध झाले. २५ हजार ब्रास अवैध वाळू उपसा झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. मात्र कारवाई करताना प्रशासनाने तहसीलदार यांना वगळून १९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
दोन तलाठी, काही पोलीस कर्मचारी, खाजगी व्यक्तींचा यात समावेश आहे. तहसीलदार या प्रकरणात प्रमुख आरोपी असताना त्यांना सोडून केलेली कारवाई आम्हाला मान्य नाही. आता या विरोधात विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार विजयसिंह पंडीत यांनी सांगीतले. हा प्रकार आपण पक्षाच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याही कानावर घालणार असल्याचे पंडीत यांनी सांगीतले.
गेवराईत घरकुलधारकांच्या बांधकामासाठीच्या वाळूवर अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी डल्ला मारल्याचे आरोप आमदार विजयसिंह पंडीत यांनी केले होते. त्यांनी यात गेवराईचे तहसीलदार खोमणे यांच्यावर थेट नाव घेत आरोप केले होते. घरकुल लाभधारकांकडून ओटीपी मिळवून त्यांना दहा हजार रुपये देऊन हजारो ब्रास वाळू ही ब्लॅकमध्ये विकून शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही पंडीत यांनी केला होता. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांनी आमदार पंडीत यांच्या तक्रारीची दखल घेत चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानंतर १९ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परंतु या कारवाईतून तहसीलदारांना वगळण्यात आले असून ही कारवाई थातूरमातूर स्वरुपाची असल्याची टीका पंडीत यांनी केली आहे. स्वतः तालुक्याचा महसूल प्रमुख प्रशासनाचा तहसीलदार तिथे उभा राहून म्हणत असतील की काही काळजी करू नका, मी या ठिकाणी आहे वाळू घेऊन जा, तर मग बाकी दुसऱ्यांना कोणाला दोष देण्यात काय अर्थ आहे? हे प्रकरण दाबण्याचा कुणाचा प्रयत्न असेल तर तो मी होऊ देणार नाही, असा इशारा पंडीत यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
विधिमंडळाच्या अधिवेशनात हा विषय मी मांडणार आहे. तिथे न्याय मिळाला नाही तर माननीय उच्च न्यायालयाचे दरवाजे मी ठोठावेल, असेही पंडीत म्हणाले. टोकाची कारवाई होणं अपेक्षित होतं ते झालेलं दिसून येत नाही. यासाठी मी हा विषय तडीस जाईपर्यंत शांत बसणार नाही. मी सगळ्या गोष्टीचा खुलासा केला होता आणि तो आरोप नव्हता हे सुद्धा ज्या ज्या गोष्टी मी बोललो ज्या पद्धतीने घरकुल धारकाच्या नावानं जे काही वाळूचं उत्खनन अवैधरित्या झाले आणि ते शंभर कोटी रुपयांच्या जवळपास उत्खनन झालेले यावरून स्पष्ट झाले आहे.
पूर्ण गेवराई तहसीलदारांच्या माध्यमातून झालेला आहे हा गैरव्यवहार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली कारटल सिंडिकेट तयार करून हे अवैध उत्खनन झालं आणि त्याची मोजणी, व्यवस्थित चौकशी झाली. मोजमापानंतर सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. १९ जणांवर गुन्हे दाखल केले. त्याच्यात कोण आहेत तर कर्मचारी, कॉन्स्टेबल, हवालदार, कोणी खाजगी व्यक्ती आहेत. परंतु तिथे उभं राहून ज्यांनी ही वाळू अवैधरित्या विकली, पावत्या कलेक्शन करतायेत त्यांची नाव मात्र यात का नाहीत? हा माझ्यासाठी सुद्धा प्रश्नच आहे. त्याच्यामुळे हे जे झालं हे कसं झालं? जिल्हा प्रशासनावर कुठला दबाव आला आहे का? हे मी समोर आणणार असल्याचे विजयसिंह पंडीत यांनी म्हटले आहे.