

Solapur News: विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाची निवडणुकीत नवा संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. याच निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरुन नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
मात्र, या निवडणुकीत अखेरच्या क्षणी मुलाला उमेदवारी मागे घ्यावी लागण्यावरुन माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी थेट मोहिते पाटलांवरच केसानं गळा कापल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जानकरांवर आरोपांवर एक घाव दोन तुकडे करत प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी (ता.5 जून) वादळी पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत त्यांनी वसंतराव देशमुखांच्या उमेदवारीवरुन जानकरांनी केलेल्या गंभीर आरोपांवर प्रत्युत्तर करताना सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीवरही रोखठोक भाष्य केलं.
माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांवर थेट केसानं गळा कापल्याचा आरोप केला होता. तसेच ज्याच्या मागे त्याच्या तालुक्यात एकही मत नाही,अशा वसंतराव देशमुखांना उमेदवारी मोहिते पाटलांनी का दिली,असा संतप्त सवालही उपस्थित केला होता. जानकरांच्या गंभीर आरोपांवर आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भूमिका मांडली आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी उत्तमराव जानकर हा माझ्या घरातला प्रश्न आहे, तो आम्ही घरात बसून सोडवू, असं स्पष्ट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी आहे, माझी पद्धत अशी आहे की, मी घरातला विषय चव्हाट्यावर मांडत नाही. हा विषय ना अकलूज ना बारामती,तर तो वेळापूरच्या घरात आम्ही घरातला विषय मिटवणार असं म्हणत मोहिते पाटलांनी एकप्रकारे उत्तमराव जानकरांच्या नाराजीवर अधिकचं भाष्य करणं टाळलं.
माढा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या पत्रकार परिषदेत सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होत असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार असून आज वसंत देशमुख यांना घेऊन सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतल्याचं सांगितलं.
या निवडणुकीतील आव्हान आणि विकास हे फक्त आम्ही टीव्हीवर पाहिले असल्याचा टोलाही मोहिते पाटलांनी यावेळी लगावला. तसेच शरद पवारसाहेबांनी दिलेला आदेश मी मान्य केला आहे. पुरोगामी विचार टिकला पाहिजे यासाठी आम्ही निवडणूक लढवत असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर सोलापूर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती भाजप नेत्यांकडून करण्यात येत होती. पण ही निवडणूक काही घमंडी लोकांमुळे लादली गेल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना मोहिते पाटील म्हणाले, ही हुकूमशाही आहे का..? लोकशाही आहे ना, त्यामुळे आम्ही निवडणूक लढणार आहोत.
यावेळी त्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोणत्याही भाजप नेत्याचा आपल्याला फोन आला नसल्याचंही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलं. आम्ही ही निवडणूक सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 616 मतदारांची जी इच्छा होती, ती पूर्ण करण्यासाठी लढवतोय असंही ते म्हणाले.
तसेच वसंत देशमुख हे मोहिते पाटील आणि सुधाकर पंत परिचारक यांच्या नेतृत्वात तयार झालेले आहेत. पंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी देशमुख हे काल स्मृतीस्थळावर गेले होते, त्यात काय चुकीचे आहे. माझ्या मागे 600 अदृश्य मतं आहेत. ती अदृश्यशक्ती माझ्या मागे आहेत. निकालादिवशी सर्व दिसणार असल्याचा खळबळजनक दावाही मोहिते पाटलांनी यावेळी केला.
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज कशा पद्धतीने बाद झाला आपण पहिले आहे. अधिक माहितीसाठी पंढपुरातून माहिती घ्या. मी श्रेयवादासाठी निवडणुकीला उभा नाहीये, मी लढणार आहे. पालकमंत्र्यांकडून निधी मनमानी पद्धतीने वाटप केला जातोय, येणाऱ्या काळात वेगळं वळण आलेलं दिसेल.
आम्ही घमंडीनं वागलो नाही आणि वागणार ही नाही,आम्ही अनेक उन्हाळे-पावसाळे पहिले आहेत. रणजितदादा हे कधीही निवडणुकीत उभे राहणार नव्हते. शक्तिपीठ महामार्गाबद्दल शेतकऱ्यांना सरकारने अगोदर सविस्तर माहिती देण्यात यावी. विकास करत असताना शेतकरी देशोधडीला लागणार नाही याचा सरकारने विचार करावा असा सल्लाही सरकारला यावेळी मोहिते पाटलांनी दिला.
माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरांनी दोन दिवसांच्या घडामोडीत माझ्या मुलाची उमेदवारी मोहिते पाटलांनीच फायनल केली होती.पण काल दोन ते अडीचच्या दरम्यान वसंतराव देशमुख मोबाईल फोन स्विच ऑफ करुन 'नॉट रिचेबल' झाले. हा एकप्रकारे मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला अशा प्रकारचीच भूमिका त्यांची राहिल्याचं म्हटलं होतं.
तसेच ज्याच्या मागे त्याच्या तालुक्यात एकही मत नाही, अशा वसंतराव देशमुखांना उमेदवारी मोहिते पाटलांनी का दिली,असा संतप्त सवालही उपस्थित केला होता. जानकरांच्या गंभीर आरोपांवर आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भूमिका मांडली आहे.
अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच्य घडामोडी पाहता माझ्या मुलाची उमेदवारी फायनल ठेवण्याचं ठरलेलं होतं, तशा बैठका झाल्या होत्या. सगळ्यात सुरुवातीला ही निवडणूक मोहिते पाटलांनी लढावी आणि त्या पद्धतीची चर्चा झाली होती. त्यानंतर माझे चिरंजीव जीनव जानकर यांची उमेदवारी फायनल केली. त्यावर अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी सही केली. मात्र,त्यानंतर दोन दिवसात वसंतराव देशमुख यांचा अर्ज भरणं हे आम्हाला खटकणारं होतं असंही जानकर यांनी सांगत नव्या वादाला तोंड फोडलं होतं. तसेच आमदार अभिजीत पाटील आणि आमदार नारायण पाटील यांना मोहिते पाटील यांच्या भूमिका पटत नव्हत्या. काल माझ्यासोबत त्यांनी घात केला किंवा दगा दिला, तो आम्हाला कोणालाही अपेक्षित नव्हता,असंही जानकर यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.