Ghansawangi Sub District Hospital news AI
मराठवाडा

Hikmat Udhan: हिकमत उढान यांनी राजेश टोपेंना दिले रुग्णालयाचे श्रेय; पण समर्थकांना सुनावले, 'थिल्लरपणा करू नका!'

Ghansawangi Sub District Hospital News: घनसावंगीच्या १०० खाटांच्या रुग्णालयावरून हिकमत उढाण आणि राजेश टोपे समर्थकांमध्ये श्रेयवाद; उढाण यांनी टोपेंना श्रेय देत समर्थकांना सुनावले.

सुभाष बिडे

Jalana politics : एखाद्या मतदारसंघातील विकास कामाचे श्रेय घेण्यावरून आजी-माजी आमदारांमध्ये नेहमीच खडाजंगी होते. दोघांचेही समर्थक सोशल मीडिया वरून झालेल्या कामाचे श्रेय आपल्याच नेत्याचे असल्याचे सांगत भिडतात. कधी कधी आला आजी-माजी आमदारांची ही फुस असते.

घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयाच्या सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर असाच श्रेयवाद माजी आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यातील नेते राजेश टोपे आणि घनसावंगीचे विद्यमान शिवसेना आमदार हिकमत उढान सुरू झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही बाजूचे समर्थक कार्यकर्ते सोशल मीडियावर या श्रेयवादावरून भांडताना दिसत आहेत.

लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या बॅनरबाजी मधूनही ते दिसून आले. आमदार हिकमत उढान यांनी मात्र इमारत निर्मितीचे संपूर्ण श्रेय हे राजेश टोपे यांचेच असल्याचे सांगत मनाचा मोठेपणा दाखवला. परंतु इमारतीच्या उर्वरित कामासाठी चा पाठपुरावा आणि निधी मात्र आपण आणला, असे सांगताना जे काम केले त्याचे श्रेय निश्चित घ्या, पण न केलेल्या कामाचे श्रेय घेत थिल्लरपणा करू नका, असा टोलाही त्यांनी टोपे समर्थकांना लगावला.

घनसावंगी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ३१ कोटी २५ लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या श्रेणीवर्धित १०० खाटांच्या नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडले. या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मागील तीन ते चार दिवसापासून इमारतीच्या कामाच्या श्रेयावरून राजकीय दावे-प्रतिदावे समोर आले आहेत.

तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या अद्ययावत नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या नवीन वास्तूमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी या प्रकल्पाच्या मंजुरीवरून आणि निधीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सोशल मीडिया वरून जोरदार श्रेयवाद सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रकल्पाची मूळ संकल्पना, प्रशासकीय मंजुरी आणि प्राथमिक निधी आपल्याच कार्यकाळात मंजूर झाल्याचा दावा माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या गटाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

तर दुसरीकडे, प्रलंबित कामाला गती देऊन बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांसाठीचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपणच पाठपुरावा केल्याचे आमदार डॉ. हिकमत उढाण यांच्या गटाकडून ठामपणे सांगितले जात आहे. लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने लावण्यात आलेले फलक आणि सोशल मीडियावरील पोस्टमधून दोन्ही बाजूंनी आपापले दावे अधिक तीव्र केले आहेत.

आरोग्य मंत्री जालना दौऱ्यावर आले असता त्या ठिकाणी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाऊन त्यांची भेट घेतली व विविध मागण्यांचे निवेदन देण्याचे सोपस्कार पार पाडले. दरम्यान सायंकाळी झालेल्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रसंगी आमदार डॉ. हिकमत उढाण यांनी आपल्या भाषणात या इमारतीच्या कामाचे संपूर्ण श्रेय आपण राजेश टोपे यांनाच देतो आणि त्यांचे जाहीर आभार मानतो, असे नमूद केले.

आमदार झाल्यानंतर या इमारतीची काही कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. खिडक्या, दरवाजे, वॉल कंपाउंडसह इतर प्रलंबित कामे गेल्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे मूळ कामाचे श्रेय नक्कीच टोपे यांना आहे. जे काम त्यांनी केले त्याचे श्रेय त्यांना देण्याचा मोठेपणा दाखवण्याची श्रीमंती आम्ही दाखवत आहोत.

मात्र, जे काम केलेच नाही त्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका, यासाठी सोशल मीडिया वरून बोगस अकाउंट उघडून श्रेय घेण्याचे प्रयत्न करू नका, असा टोला त्यांनी राजेश टोपे यांना उद्देशून लगावला. 'शुरुवात तुमने किया है, हरबार खतम हम करेंगे' फेक अकाउंट वरुन चिल्लर अन छिचोरे चाळे बंद करा असा इशाराही उढान यांनी दिला. दुसरीकडे श्रेयवादाच्या राजकारणापेक्षा रुग्णालयात पूर्ण क्षमतेने उपचार सुरू होणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना सामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT