Girish Mahajan Sarkarnama
मराठवाडा

Girish Mahajan : गिरीश महाजनांनी शब्द पाळला नाही, 20 दिवसाला...

Jagdish Pansare

Marathwada BJP News : जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळावा, अशी मागणी नेहमीच सत्ताधारी पक्षाकडून केली जाते. पण सत्तेसाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, पदांचे वाटप यातून अनेकदा बाहेरून पालकमंत्री लादले जातात. राज्यात सत्ता कोणाचीही असो ही परंपरा कायम आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा अमित देशमुख जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्यावर भाजपकडून कायम टीका केली जायची.

पण आता राज्यात महायुतीचे सरकार आणि मुळचे जळगाव जिल्ह्यातील असलेल्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे लातूर जिल्ह्याचे पालकत्व सोपवण्यात आले आहे. गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदी निवड झाल्यापासून जिल्ह्यात नाराजीचा सूर आहे. बाहेरचा पालकमंत्री नको, अशी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांचीही भावना होती. परंतु आमदार संभाजी पाटील निलंगेकर-अभिमन्यू पवार या दोन नेत्यांच्या संघर्षात जिल्ह्याला मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील सत्तांतरानंतर गिरीश महाजन यांच्याकडे लातूरची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा त्यांनी दर 20 दिवसाला लातूरात येईन, असा शब्द दिला होता. पण त्यांच्या हा शब्द आणि आश्वासन हवेतच विरले. केवळ झेंडा वंदनासाठी येणाऱ्या पालकमंत्र्यांच्या यादीत महाजनांचे नाव समाविष्ट करावे लागते की काय? अशी परिस्थिती आहे. आज (सोमवारी) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला तरी महाजन प्रत्यक्ष हजर राहतील, अशी अपेक्षा होती.

परंतु त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली, त्यामुळे त्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडल्याची टीका होऊ लागली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या डीपीडीसी बैठकीत महाजन यांनी काही धडाकेबाज निर्णय घेत जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लावली होती. त्यामुळे लातूरकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, पण आता पालकमंत्र्यांचे दर्शनच घडत नसल्याने त्या फोल ठरत आहेत. त्यानंतर झालेल्या तीनही बैठकांना महाजन ऑनलाइनच हजर होते. गिरीश महाजन यांच्या या अशा ऑनलाइन कारभाराचा फटका लातूरकरांना बसत असून जिल्ह्यातील विकासकामे रखडल्याची ओरड होत आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT