Sanjay Shirsat | Atul Save Sarkarnama
मराठवाडा

Atul Save-Sanjay Shirsat News : संभाजीनगरकरांनो, तुमचा पालकमंत्री कोण होणार; शिरसाट की सावे!

Guardian Minister of Sambhajinagar Save Or Shirsat : पालकमंत्री पद शिवसेना शिंदे गटाकडे आधी संदिपान भुमरे आणि ते लोकसभेवर निवडून गेल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे होते. त्यामुळे पालकमंत्री पद संजय शिरसाट यांना मिळेल, असा दावा केला जात आहे.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू या दोन घटनांमुळे सध्या संपूर्ण राज्याचे राजकारण तापलेले आहे. अशातच नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या पालकमंत्री (Guardian Minister) पदाचा तिढा कायम आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या एक-दोन दिवसात पालकमंत्र्यांची नावे जाहीर होतील, असे सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार? याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीने 2019 प्रमाणे या ही वेळी सर्व जागा जिंकल्या. शिवसेना शिंदे गटाने जिल्ह्यातील नऊ पैकी सहा तर भाजपने तीन जागा जिंकत महाविकास आघाडीला व्हाईट वॉश दिला. जिल्ह्याला दोन मंत्रीपदं मिळाली असून शिवसेनेने भाकरी फिरवत जिल्ह्यातून माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याऐवजी विधानसभेच्या पश्चिम मतदार संघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेल्या (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांना मंत्री केले.

सामाजिक न्याय विभागाचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर दुसरे भाजपचे अतुल सावे हे दुसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या अतुल जावे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने पक्षातील त्यांचे वजन वाढले आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केलेल्या भाजपकडून जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे असावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

परंतु गेल्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेना शिंदे गटाकडे आधी संदिपान भुमरे आणि ते लोकसभेवर निवडून गेल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे होते. त्यामुळे नव्या सरकारमध्ये पालकमंत्री पद शिवसेना शिंदे गटाकडे म्हणजेच संजय संजय शिरसाट यांना मिळेल, असा दावा केला जात आहे. दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महायुती सरकारनंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे भाजप पालकमंत्री पद देताना गेल्यावेळचा पॅटर्न पुन्हा राबवेल, असे ठामपणे सांगता येत नाही.

आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका पाहता पालकमंत्री पद भाजप कडे म्हणजेच अतुल जावे यांच्याकडे असावे, अशी मागणी स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांनी यापूर्वीच केली आहे. तर जालन्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने इतर कोणीही पालकमंत्री चालेल पण अतुल जावे आम्हाला नको, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने भाजप संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर दावा सांगू शकतो, अशी चर्चा आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तानातानी होऊ नये याची काळजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आणि हे पद पुन्हा शिवसेनेला दिले जाईल, असे बोलले जाते.

पालकमंत्री पदावरून वाद वाढला तर कदाचित मुंबईतील मंत्री असलेल्या एखाद्या नेत्यावर पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवली जाईल, अशीही चर्चा आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणालाही मिळाले तरी जिल्ह्यातील प्रश्न ते किती गांभीर्याने सोडवतात? हे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना- भाजप या दोन्ही पक्षांना शहरातील पाण्याचा प्रश्न डोकेदुखी ठरणार आहे. पाणीपुरवठा योजना दिल्याचे श्रेय दोन्ही पक्षांकडून घेतले जात असले तरी अद्याप संभाजीनगरकरांना 24 तास पाणी मिळत नाहीये. निवडणुकीपूर्वी तरी ते मिळेल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT