
Chhatrapati Sambhajinagar News, 22 Dec : महायुती सरकारमधील नेत्यांचे शपथविधी पार पडल्यानंतर या मंत्र्यांचं खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर शनिवारी (ता.21) रात्री महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं. या खातेवाटपात अनेक बदल केले जातील असं बोललं जात होतं.
शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांना मागील सरकारमधील खाती मिळणार की नाही? याकडे देखील अनेकांचं लक्ष लागलं होतं. मात्र, मागील खाती मिळवण्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना यश आलं आहे. त्यानुसार एकनाथ शिंदेंकड नगरविकासआणि अजितदादांकडे अर्थखातं पुन्हा एकदा देण्यात आलं आहे.
एकीकडे खातेवाटप पूर्ण झालं आहे तर दुसरीकडे आता मंत्रीपद मिळालेल्या नेत्यांना पालकमंत्रिपदाचे वेध लागल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी थेट छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, असा दावा केला आहे.
शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आणि मंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यानंतरही नेत्यांनी पालकमंत्रिपदावर दावा केल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांच्या वाट्याला सामाजिक न्याय हे खातं आलं आहे. तर शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते संभाजीनगरमध्ये आले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सामाजिक न्याय खातं आपण शिंदेसाहेबांकडे मागून घेतल्याचं सांगितलं. शिवाय याचवेळी त्यांनी पालकमंत्रिपदावर दावा केला.
शिरसाट म्हणाले, "मागील 40 वर्षांपासून मी काम करतोय, त्या कष्टाचं फळ आज मला मिळालं. त्यामुळे माझं चौकाचौकात स्वागत होत आहे. माझ्यासाठी हा सर्वात मोठा आनंद आहे. कारण माझे सर्व कार्यकर्ते खूष आहेत. आता मिळालेली मंत्रिपदाची संधी ही लोकांची सेवा करण्यासाठी मिळाली आहे."
दरम्यान, यावेळी छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार? असा प्रश्न विचारलं असता शिरसाट म्हणाले, "छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार आहे. त्याची चिंता मला नाही कारण पालकमंत्री मीच राहणार आहे. मात्र, बरोबरीला हे खातं असल्यामुळे जास्त लक्ष महाराष्ट्राकडे द्यावं लागणार आहे." तर शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे आता मंत्र्यांना एक खातं मिळालं तरी पालकमंत्रिपदाचा मोह सुटत नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.