Sarkarnama
Sarkarnama
मराठवाडा

हरीभाऊ बागडे अध्यक्षपदासाठी निश्चित : उपाध्यक्षपदासाठी भूमरे समर्थक-काँग्रेसमध्ये चूरस!

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांचे नाव जवळपास निश्चित आहे. मात्र, खरी चुरस उपाध्यक्षपदासाठी असणार आहे. या पदासाठी काँग्रेसही (congress) आग्रही असून बोरसे यांचे नाव चर्चेत आहे, तर कट्टर समर्थक नंदलाल काळे यांच्यासाठी शिवसेनेचे (shivsena) मंत्री संदीपान भूमरे (Sandipan Bhoomre) यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. मात्र, याबाबतचा निर्णय उद्या सकाळीच होणार आहे. (Haribhau Bagade confirmed for post of President of Aurangabad District dudh sangh)

औरंगाबाद जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस या पक्षांनी बाजी मारली आहे. यात राष्ट्रवादीनेही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे १४ जागांपैकी सात जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. त्यानंतर सात जागांसाठी निवडणूक झाली. यात एकता पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. अध्यक्षपद हे दूध संघाचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्याकडे जाणार असल्याचे जवळपास पक्के झाले असल्याची माहिती काही संचालकांनी दिली. मात्र, उपाध्यक्षपदासाठी चुरस दिसून येत आहे.

उपाध्यक्षपदी नवीन चेहरा देण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचेही प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे बोरसे यांचे नाव चर्चेत आहे. तर कॅबिनेट मंत्री भुमरे हे पुन्हा त्यांचे कट्टर समर्थक नंदलाल काळे यांच्यासाठी आग्रही दिसून येत आहेत. मात्र, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे काय निर्णय घेणार याकडेही लक्ष लागून आहे. दुसरीकडे बिनविरोधसाठी पुढे आलेल्या काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांच्यातर्फेही उपाध्यक्षपदासाठी प्रयत्न करीत आहे. या संदर्भात शनिवारी सकाळी राजकीय पक्षांची बैठक होणार आहे.

उपाध्यक्षपद हे प्रतिष्ठेचे बनले आहेत. जिल्हा बँकेत आमदार हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची परतफेड म्हणून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा दूध संघात आमदार बागडेंसाठी ताकद लावली होती. स्वत:च्या मतदार संघातील दोन भाजपच्या जागाही बिनविरोध निवडून आणल्या होत्या. त्यामुळे अध्यक्षपद हे आमदार बागडेंकडेच रहाणार आहे, तर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस भारी पडणार की शिवसेना हे उद्याच स्पष्ट होईल.

दरम्यान, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीनंतर शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता या निवडीसाठी बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी तुळशीराम भोजने यांनी शुक्रवारी (ता. ४ फेब्रुवारी) दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT