Governor Haribhau Bagde-MP Kalyan Kale Sarkarnama
मराठवाडा

BJP Politics : हरिभाऊ बागडेंना राज्यपाल पदी बढती, विधानसभा इच्छुकांचे कल्याण..

Jagdish Pansare

नवनाथ इधाटे

Phulambri Assembly Constituency : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष व फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे उर्फ नाना यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष पद भुषवल्यानंतर बागडे यांना मिळालेले हे मोठे पद असून हा पक्षाने त्यांचा एकप्रकारे केलेला सन्मान असल्याच्या प्रतिक्रिया राजकारणात उमटत आहेत.

दुसरीकडे बागडे नानांऐवजी यावेळी फुलंब्रीतून नव्या चेहऱ्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्या पक्षातील अनेक इच्छूकांचे आता कल्याण होणार आहे. (Haribhau Bagde) बागडे नाना 2024 ची विधानसभा लढवण्याच्या तयारीत होते. अनुभवी आणि पक्षातील ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारणे राज्यातील नेत्यांना जड गेले असते. त्यामुळे यावेळी बागडे नाना नको म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या इच्छूकांची मनोकामना पुर्ण झाली असेच म्हणावे लागेल.

काल रात्री उशीरा हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याचे वृत्त धडकले आणि इच्छुकांच्या आनंदाला उधाण आले. बागडे यांच्याशी स्पर्धा करून फुलंब्री विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारी आणणे कोणालाही शक्य झाले नसते. नानांची राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याने इच्छुकांचा आता `सुंठे वाचून खोकला गेला`, असेच म्हणावे लागेल.

दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीतील इच्छूकांचाही मार्ग डाॅ. कल्याण काळे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्यामुळे मोकळा झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्रीतून नव्या चेहऱ्याचा आमदार दिसणार एवढे मात्र निश्चित. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील एकमेकाचे पारंपारिक राजकीय विरोधक विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे व काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे (Kalyan Kale) या दोन मातब्बरांचा अडसर दूर झाला.

फुलंब्रीत सध्या महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीकडच्या इच्छूंकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची निर्मिती होण्याअगोदर पासून काँग्रेस आणि भाजप यांचे मतदार संघावर वर्चस्व राहिले आहे. यात भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी युती सरकारच्या काळातही मंत्री पद भूषवले आहे. त्यानंतर 2003 ते 2014 या काळात डॉ.कल्याण काळे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले.

2014 च्या मोदी लाटेत हरिभाऊ बागडे विजयी होऊन थेट विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यामुळे 2019 च्या विधानसभेत काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे यांना अपयश आले. मात्र 2024 च्या लोकसभेमध्ये डॉ. कल्याण काळे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव करून खासदारकी मिळविली. तर आता आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली.

त्यामुळे या मतदारसंघातील आजी-माजी आमदार मोठ्या पदावर पोहोचल्याने हा मतदारसंघ नवीन चेहऱ्याची वाट पाहत आहे. महायुती-महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षातील दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना आमदारकीचे वेध लागले आहे. इच्छुक भावी उमेदवारांनी आता मतदार संघात पकड मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

नानांचा वारसदार कोण ठरणार ?

फुलंब्री विधानसभा मतदारसंघावर भाजपचे कायम वर्चस्व राहिले आहे. तालुक्यात बागडे नानांचा शब्द अंतिम मानला जायचा. आता बागडे नाना यांचा नवा राजकीय वारस कोण ठरणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून बाजार समिती सभापती अनुराधा चव्हाण, उच्चतम बाजार समिती सभापती राधाकिसन पठाडे, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, भजपचे महामंत्री राजेंद्र साबळे पाटील, माजी उपमहापौर विजय औताडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील अशा इच्छूकांची लांबच यादी आहे.

पक्षाकडे जोर लावून उमेदवारी मिळवण्यात कोण यशस्वी होतो? आणि निवडून कोण येतो यावर नानांचा वारस कोण? हे ठरेल. काळेंना खासदारकीची लाॅटरी लागल्याने मतदारसंघात त्यांची जागा घेण्यासाठी काँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा लागली आहे. सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे, तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, युवकचे माजी जिल्हाध्यक्ष वरून पाथ्रीकर यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे.

दुसरीकडे राज्यात भाजप, शिवसेना-राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची महायुती आहे. त्यामुळे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून माजी अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार हे जागा शिवसेनेला सोडवूण घेण्यासाठी अन् उमेदवारीसाठी जोर लावणार आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट) फुलंब्री मतदारसंघ आघाडीत आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

त्यामुळे जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र पाथ्रीकर, जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची तालुक्यात मोठी ताकद आहे. ती पाहता हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न या पक्षाकडूनही केले जाणार आहेत. बाजार समिती संचालक अभिजीत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख यांची नावे समोर येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा संघटक अक्षय खेडकर यांचे नाव सध्या चर्चेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT