Harshvardhan Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav : ना गाजावाजा, ना शक्तिप्रदर्शन; हर्षवर्धन जाधवांनी भरला गुपचूप उमेदवारी अर्ज!

Jagdish Pansare

Lokasbha Election 2024 : मागील लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात आपल्या ट्रॅक्टर फॅक्टरमुळे शिवसेनेच्या विजयाला पंक्चर करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी पुन्हा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा नाही, की शक्तिप्रदर्शन नाही अगदी गुपचूप जाऊन जाधव यांनी अर्ज दाखल केल्याने अनेकांना धक्का बसला.

2019 आणि 2024 या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले असून, हर्षवर्धन जाधव यांच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढउतार येऊन गेले. आर्थिक आणि कौटुंबिक संकटातही जाधव यांनी यंदा पुन्हा लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. शहरात आपले प्रचार कार्यालय सुरू केल्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी जाधव यांनी उमेदवारी दाखल करत हम भी है मैदान मे, असा संदेश सत्ताधारी आणि विरोधकांना दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव हे राज्यातील पहिले आमदार ठरले होते. या शिवाय पीकविमा, शेतकऱ्यांना मिळणारी वीज, खत असे विषय घेऊन जाधव गेल्या पाच वर्षांपासून कन्नड-सोयगाव मतदारसंघात काम करत आहेत. राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला हर्षवर्धन जाधव यांनी अंतरवाली सराटीत जाऊन पाठिंबा दिला होता.

पण जरांगे यांनी केलेली मागणी पूर्ण होऊ शकत नाही, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळवायचे असेल, तर संसदेत 50 टक्के मर्यादेची अट शिथिल करावी लागेल, त्यासाठी कायदा करावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका जाधव यांनी जरांगे यांच्यासमोरच मांडली होती. त्यानंतर चोहोबाजूंनी जाधव यांच्यावर टीका झाली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 83 हजार मते मिळाली होती.

याचा फटका शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना बसला होता. एमआयएमचा खासदार निवडून आणण्यास मदत केल्याचा ठपका जाधव यांच्यावर ठेवला गेला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांचा कन्नड-सोयगाव मतदारसंघातून शिवसेनेने पराभव करत त्यांना माजी केले होते.

दरम्यान, दोन वेळा आलेला हृदयविकाराचा झटका, झालेली आर्थिक कोंडी अशा परिस्थितीत हर्षवर्धन जाधव किती भक्कमपणाने ही निवडणूक लढवतात, त्यांना काही छुपी आर्थिक मदत होते का? यावरच ते उमेदवारी कायम ठेवतात? की माघार घेतात हे ठरणार आहे.

आज पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांनी पहिले पाऊल उचलले आहे. आता माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत काय काय राजकीय घडामोडी घडतात, कोण कोण त्यांच्या गुप्त भेटीगाठी घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT