Dharashiv Loksabha Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant News : आरोग्यमंत्र्यांची जनसंपर्क मोहिमेतून लोकसभेची तयारी..! उमेदवार सावंत कुटुंबातुन असल्याचा दावा...

Shital Waghmare

Tanaji Sawant News : धाराशिव जिल्ह्यात महायुतीचा मेळावा 14 जानेवारी रोजी पार पडला होता. या मेळाव्यात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी लोकसभेच्या उमेदवारी आणि विकासाबाबत इतर जिल्ह्यातील नेत्यांनी लुडबुड करू नये, असा इशारा दिला होता. धाराशिव लोकसभेचा उमेदवार हा या जिल्ह्यातील असेल. पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार चालू देणार नाही, अन्यथा स्फोटक राजकारण करीन, असा इशाराही त्यांनी दिला होता.

मागील काही दिवसापासून वारंवार होणाऱ्या बॅनरबाजीमधून त्यांनी महायुतीचा उमेदवार हा सावंत कुटुंबियांचाच असल्याचा सूचक इशारा दिला आहे. देशात लोकसभेसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातही उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. डॉ. तानाजी सावंत यांनीही आता संपर्क कार्यालय उद्घाटनाच्या निमित्ताने लोकसभेसाठी जनसंपर्क मोहीम सुरू केल्याचे बॅनरबाजीतून दिसून येत आहे.

त्यामुळे आरोग्यमंत्री सावंत हे धाराशिव लोकसभेची जागाही सावंत कुटुंबीय लढविणार असल्याचा दावा करीत असल्याचे बोलले जात आहे. सावंत हे मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये चर्चेत आहेत. मागील पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सलग तीन दिवस जिल्ह्यात विकासकांमाच्या भूमिपूजनाचा धडाका लावला. महायुतीच्या मेळाव्यालाही येऊन ते धाराशिव लोकसभा निवडणूकसाठी सूचक बोलले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ येथून कोणीतरी यायचे आणि हे मी ऐकून घेणार नाही. इतर बाहेरच्या नेत्यांनी जिल्ह्यात उमेदवारीच्या फंदात पडू नये. धाराशिव जिल्ह्याच्या उमेदवारी बरोबरच विकासाच्याबाबतीत इतर जिल्ह्यातील नेत्यांनी लुडबुड करू नये. आपली कुवत व औकात किती, आपण नेमकं काय करतो, आपले मूल्य आहे ते पाहून आत्मचिंतन करावे. इतकी माफक अपेक्षा आहे. त्यांनी दुसऱ्याच्या जिल्ह्यात ढवळाढवळ करू नये, असा इशाराही त्यांनी दिला होता.

महायुतीच्या मेळाव्यापूर्वीही दोन दिवस अगोदर सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर व्हायरल झाले होते. महायुतीच्या मेळाव्यात याविषयी त्यांनी मौन बाळगले. सोमवारीही शिवसेना प्रणित जनसंपर्क कार्यालयाचे कळंब येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळीही त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे भावी खासदार म्हणूनच ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले.

जिल्ह्यात भूम, परंडा, कळम आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये संपर्क कार्यालय सुरू करण्यात आली आहेत. कळम व धाराशिव येथे लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये सावंत यांचे पुतणे व कार्यकर्ते यांचे फोटो आहेत. परंतु या बॅनरवरच त्यांच्या शिवसेना शिंदे गटातील उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार झेंडा चौगुले व धाराशिव लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा फोटो मात्र नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा जोरात सुरू आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT