Hemant Patil, Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Hemant Patil Resignation : खासदार हेमंत पाटील राजीनाम्यावर ठाम; संसदेत नेमके काय झाले ?

Laxmikant Mule

Nanded Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून खासदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या लोकसभा अध्यक्षांकडे खासदारकीचा राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी लोकसभेच्या कामकाजाकडे पाठ फिरविली. दरम्यान, राष्ट्रपतींनी पाटील यांना समन्स बजावून उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार ते सोमवारी लोकसभा अध्यक्षांपुढे हजर झाले. परंतु, त्यांनी अधिवेशनादरम्यान कुठल्याही कामकाजात सहभाग घेतला नाही. आता त्यांच्या राजीनाम्यावर लोकसभा अध्यक्ष योग्य तो निर्णय घेणार असून, लोकसभा अध्यक्षांच्या कोर्टात असून काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ऑक्टोबरमध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावत होती. याकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले जावे आणि या प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनी २९ ऑक्टोबरला राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. परंतु, त्यावर कुठलाही निर्णय झाला नव्हता. राजीनामा दिल्यापासून त्यांनी लोकसभेच्या कुठल्याच कामकाजात सहभाग नोंदविला नाही. खासदार पाटील अर्थ समितीचे सदस्य असल्याने त्यांनी हजर राहणे गरजेचे होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत पाटील यांना समन्स बजावत ४ डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार पाटील हे दिल्लीत पोहोचले. परंतु, त्यांनी लोकसभा अधिवेशनात सहभागी न होता लोकसभा अध्यक्षांच्या दालनात हजर झाले.

या वेळी लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या सुनावणीत खासदार पाटील यांनी राजीनामा देण्यामागील भूमिका मांडली. तदनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले. आता पाटील यांच्या राजीनाम्यावर लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

खासदार हेमंत पाटील यांनी मागील वर्षी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्रातील खासदारांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वज्रमूठ बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी पुढाकार घेत महाराष्ट्र सदन येथे आयोजित बैठकीस २३ खासदारांनी उपस्थिती दर्शविली होती. तसेच राजीनामा दिल्यानंतर दिल्ली येथे त्यांनी लाक्षणिक उपोषणही केले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळत आहे. समाजाच्या भावना लक्षात घेऊन आपण खासदारकीचा राजीनामा दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीची केंद्र शासन आणि सभागृहात गंभीर दखल घेतली जावी म्हणूनच आपण लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला. त्यामुळे अधिवेशनास उपस्थित राहणे उचित नाही. राजीनाम्यावर लोकसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो मान्य आसे खासदार हेमंत पाटलांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT