Hemant Patil, Bhavna Gawali  Sarkarnama
मराठवाडा

Shiv Sena News : उमेदवारी कापलेले पाटील-गवळी आले एकत्र...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या महायुतीच्या जागावाटपात भाजप-राष्ट्रवादी (BJP- NCP) या मित्रपक्षांनी शिवसेनेला चांगलाच धक्का दिल्याचे आतापर्यंतच्या घडामोडीवरून दिसून आले आहे. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने आतापर्यंत आठ उमेदवारांची एकमेव यादी जाहीर केली आहे. राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोबत आलेल्या 13 विद्यमान खासदारांना परत उमेदवारी मिळवून देताना मुख्यमंत्री शिंदे यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

त्यात ज्या आठ उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती, त्यातील हिंगोलीचे हेमंत पाटील आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघाच्या भावना गवळी या विद्यमान खासदारांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की शिंदेंवर ओढावली होती. त्यामुळे साहजिकच पाटील-गवळी दोघेही नाराज झाले. मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटील (Hemant patil) यांची नाराजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील (Rajshree Patil) यांना यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून उमेदवारी देऊन दूर केली.

मात्र, हे करत असताना तेथील विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gavali) यांची हक्काची जागा मात्र हिसकावून घेतली. भाजपने अंतर्गत सर्वेचे कारण पुढे करत हेमंत पाटील आणि भावना गवळी यांची उमेदवारी मागे घ्यायला लावली, असा आरोप केला जातो. हक्काचा मतदारसंघ काढून घेतल्यामुळे भावना गवळी कमालीच्या नाराज झाल्या. त्यांनी राजश्री पाटील यांच्या प्रचारातून अंग काढून घेतले. अगदी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकांना गैरहजर राहत आपला राग व्यक्त केला.

शिंदे यांनी भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन दिले खरे पण त्यावर काही गवळी विश्वास ठेवायला तयार नव्हत्या. अखेर नुकतेच बुलडाणा Buldhana दौऱ्यावर गेलेल्या शिंदेना भावना गवळी यांची समजूत काढण्यात यश आल्याचे बोलले जाते. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या (Washim Loksabha Constituency) महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील (महल्ले) यांना भावना गवळी यांनी पाठिंबा जाहीर केला. त्याबद्दल त्यांच्या वाशीम येथील जनसंपर्क कार्यालयात खासदार हेमंत पाटील यांनी भेट घेतली. या निमित्ताने उमेदवारी कापलेले दोन विद्यमान खासदार एकत्र आले.

या वेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भावना गवळी यांनी राजश्री पाटील यांना पाठिंबा देत प्रचारात सक्रिय होण्याचे आश्वासन दिल्यामुळे हेमंत पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी व उमेदवार राजश्री पाटील यांचा जीव भांड्यात पडला आहे. तिकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघाची (Hingoli Loksabha constituency) जबाबदारी पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर Santosh Bangar यांच्यावर सोपवली आहे.

स्वतः मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसांत हिंगोलीमध्ये बाबूराव कदम कोहळीकर BaBurao kadam Kohalikar यांच्यासाठी दोन सभा घेत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. हेमंत पाटील मात्र पत्नीच्या प्रचारासाठी यवतमाळ-वाशीममध्येच अडकले आहेत. त्यामुळे हिंगोलीचे विद्यमान खासदार असूनही त्यांचा बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी उपयोग होत नाही.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT