Hingoli Loksabha Constituency  Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Loksabha Constituency : `मीच उमेदवार`, हेमंत पाटलांच्या दाव्यानंतर ठाकरे गटाकडून कोण ?

Laxmikant Mule

Shivsena Marathwada News : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून `मीच उमेदवार`, असा दावा शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी नुकताच केला. यावर आता ठाकरे गटाकडून त्यांच्याविरोधात कोण मैदानात उतरणार ? याची चर्चा सुरू झाली आहे. (Hingoli Loksabha Constituency) लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून राष्ट्रीय स्तरावर एनडीए, 'इंडिया' आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

जागा वाटपांचा फार्मुला अद्याप ठरला नसला तरी विविध जागांवर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मराडवाड्यातही हेच चित्र सध्या पाहायला मिळते आहे. (Hingoli) हिंगोलीच्या जागेवर महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष दावा सांगत आहेत. पण ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता जास्त आहे. (Shivsena) शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी ही जागा आम्हीच लढवणार, असे ठामपणे सांगितले आहे. ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्यास उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे.

माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा या प्रमुख नावांची चर्चा सुरू झाली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचारसरणीचा मतदार असल्याने सत्ता नसतानाही शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून (Hemant Patil) हेमंत पाटील हे विजयी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मतदारसंघांतील मतदार बदलाला पसंती देणारा असल्याने अलीकडच्या काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विद्यमान खासदार निवडून आलेला नाही. गेल्या निवडणुकीत खासदार हेमंत पाटील यांनी माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. वानखेडे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. ते पुन्हा शिवसेना ठाकरे गटात सामील झाले आहेत. ते हिंगोलीमधून उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

हादगाव विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा ते निवडून आले आहेत. नांदेड जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव हिंगोली लोकसभेसाठी चर्चेत आले आहे. ते लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असून त्यांची पाटी कोरी आहे. त्यांच्या नावाला काँग्रेसमधून पसंती मिळत असल्याचे बोलले जाते.

उमरखेड, हादगाव, किनवट या विधानसभा मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांना उमेदवारी मिळाली तर ते खासदार हेमंत पाटील यांना चांगली टक्कर देऊ शकतात. वसमत विधानसभा मतदारसंघातून अद्याप लोकसभेसाठी कुणाला संधी मिळालेली नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वसमतचा खासदार करायचा, असा मतप्रवाह जिल्ह्यात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचेही नाव यातूच चर्चेत आले आहे.

त्यांचा वसमत विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ते ज्येष्ठ नेते असून पक्ष फूटीनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. युतीच्या सरकारमध्ये ते सहकारमंत्री होते. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत. या मतदारसंघातून मीच निवडणूक लढवणार, असा दावा त्यांनी केला आहे. मग शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण? असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट अशीच लढत रंगण्याची शक्यता आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT