Hingoli News : राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या धाडसत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. सांगोल्यातील माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यात शहाजीबापूच्या तीन कार्यालयातील छापेमारीत काहीच सापडले नसले तरी,एका सराफ व्यावसायिकाच्या घरात 28 लाख 50 हजार रुपयांची रोकड सापडल्याची माहिती भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याचदरम्यान आता हिंगोलीतून (Hingoli) मोठी खळबळजनक माहिती समोर येत आहे.
एकीकडे नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासनासह पोलिस यंत्रणाही सतर्क आहे. हिंगोलीत पोलिसांच्या भरारी पथकानं एका कारमधून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
हिंगोली पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित चार चाकी वाहनाची तपासणी केली. यातपासणीदरम्यान, बॅगेत मोठी रोकड आढळून आली. या बॅगमधील संपूर्ण रोकड घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. यानंतर या कार व रोकडविषयी चौकशी करण्यात आली आहे.
शहरातील शेतकरी भवन परिसरात हिंगोली पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली. ज्या गाडीतून एक कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली ती टाटा नेक्सन कंपनीची आहे. पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या बॅगेत 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले आहेत. याप्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे.
मराठवाड्यातील हिंगोली नगरपालिकेची निवडणूक चांगलीच वादात सापडली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची पातळी अगदीच घसरल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, शिवसेनेचे संतोष बांगर यांच्या आरोप-प्रत्यारोपांवरून हिंगोलीचं राजकारण ढवळून निघालं आहे.
शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे रडत सांगणारे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून पन्नास कोटी मिळाल्याबरोबर त्यांच्यासोबत गेले, असा आरोपही मुटकुळे यांनी केला. यानंतर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्या घरी झालेल्या पोलीस कारवाईबद्दल खळबळजनक माहिती दिली आहे.
आपल्या घरी सकाळी सहा वाजता शंभर पोलीस घुसले आणि त्यांनी सर्च वॉरंट दाखवून तपासणी सुरू केली,यावेळी घरात आई, पत्नी आणि मुले झोपेत होती. असा खळबळजनक दावा बांगर यांनी केला. हिंगोली शहरात शिवसेनेची फळी उभी केल्यामुळेच राजकीय विरोधकांनी ही कारवाई घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.