

वादग्रस्त बॅग प्रकरणात भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची शिवसेना नेते यांनी ठाम बाजू घेतली आहे.
निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्या आरोपांवर भाजप नेते अशिष शेलार यांनी तीव्र पलटवार करत टीका करण्याआधी विचार करण्याचा सल्ला दिला.
पैशांच्या बॅगेवरून सुरू झालेल्या वादामुळे भाजप-शिवसेनेतील कोकणातील राजकीय तणाव अधिकच वाढताना दिसत आहे.
Ratnagiri News : तळकोकणात भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पैशांच्या बॅगेवरून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना जबाबदार ठरवले आहे. तसेच येथे युती तुटण्यासही त्यांनाच जबाबदार मानले आहे. यामुळे येथे मतदानाच्या तोंडावर भाजप-शिवसेना असा वाद सुरू झाला असतानाच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रवींद्र चव्हाण यांची पाठराखण केली आहे. तर मंत्री अशिष शेलार यांनी टीका करणाऱ्या निलेश राणे आणि दीपक केसरकर यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी सुर्यावर थुंकणार्यांच्या तोंडावरच ती पडते. त्यामुळे टीका करण्याआधी याचा विचार करावा असा आपला सल्ला असल्याचे म्हटले आहे. यामुळे एकीकडे वाद शांत करण्याचा प्रयत्न शिंदेंची शिवसेना करत असतानाच दुसरीकडे वादात तेल ओतण्याचे काम भाजपचे नेते करताना दिसत आहेत.
तळकोकणात युती तुटल्यावरून सुरू झालेल्या वाद आता निवडणुकीत वाटपाच्या पैशांपर्यंत पोहचला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरात सापडलेल्या पैशांच्या बॅगेवरून रवींद्र चव्हाण यांना जबाबदार ठरवले. तसेच निलेश राणे आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी स्वबळाचा नारा देणाऱ्या निलेश राणेंना सेफ करत युती तुटण्यास रवींद्र चव्हाण यांना जबाबदार ठरवले होते. ज्यानंतर येथे भाजप विरूद्ध शिवसेना असा सामना रंगला.
वाद वाढल्यानंतर आणि पैशांच्या बॅगेवरून रवींद्र चव्हाण यांनाच जबाबदार धरल्याने त्यांनी संताप व्यक्त केला तसेच आपल्याला २ तारखेपर्यंत ही युती टिकवायची असल्याचे वक्तव्य केलं. ज्यानंतर राज्यात युती तुटणार असे तर्क-वितर्क लावले जात आहे. अशातच मालवणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभेला हजेरी लावत येथे निलेश राणेंचाच कल्ला आणि तेच इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणेच करेगा असे म्हणत त्यांना बळ देण्याचे काम केलं.
तर सध्याच्या वादावर राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील भाष्य करताना जे झालं ते योग्य नव्हते. पण आपण जो योग्य आहे. त्याच्याच मागे आहोत. भले कुठे आपल्या पक्षाचे लोक असले तरिही सत्याच्या मागे आपण उभे राहू, असे म्हटले होते. यामुळे एकाच वेळी निलेश राणेंना शिंदेबरोबरच फडणवीस यांचे बळ मिळाल्याची चर्चा सुरू झाली होती.
या चर्चेदरम्यानच शिंदेंच्या शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी युती आणि निलेश राणेंनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती व्हावी यासाठी आम्ही सर्वानी प्रयत्न केले होते. मात्र ते काही शक्य होऊ शकले नाही. त्यामुळेच तेथे आता भाजप आणि शिवसेना आमने सामने आले आहेत. दरम्यान मालवणमध्ये जो काही प्रकार समोर आला त्यानंतर निलेश राणेंनी जे आरोप केले ते गंभीर आहेत. त्याची शहानिशा निवडणूक आयोग करेलच. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. तर चौकशी अंती जे काही सत्य आहे ते समोर येईल. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या युतीबाबतच्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण देत त्यांनी बाजू सांभाळली आहे. योगेश कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय. त्यांच्यामुळेच खेडमध्ये युती होऊ शकली अशी भूमिका मांडली आहे.
दरम्यान केसरकरांनी विरोधकांना मत देण म्हणजे भाजपला मत देण्यासारखं आहे. त्यामुळे विरोधक काय तर भाजपलाही मत देवू नका असे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. यावर भाजपचे नेते मंत्री अशिष शेलार यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी, जसे लोकांची घर वापसी होते. तशी मतवापसीही होऊ शकते. यामुळे केसरकर यांचीही मतवापसी होईल असा विश्वास व्यक्त करताना टोला त्यांनी लगावला आहे.
त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर होणाऱ्या आरोप आणि टीकेला उत्तर देताना, काही लोक येथे मालवणला बदनाम करण्याचे काम करत आहेत. आपल्यात राजकीय भेद असतील, पक्ष भेद असतील पण जर कोणी मालवणच्या माणसाला नख लावण्याचे काम करत असले तर हे भाजप कदापि सहन करणार नाही, असे नाव न घेता निलेश राणेंवर हल्लाबोल केला आहे.
रवींद्र चव्हाण यांनी येथे योग्य उमेदवार दिलेच आहेत. तसेच मंत्री असतानाही येथील रस्त्यांचा चेहरा-मोहराही बदलून टाकला. त्यामुळे त्यांच्यावर होणारे हल्ले, आरोप भारतीय जनता पक्ष सहन करणार नाही. निवडणूका येतील जातील पण सुर्यावर थुंकण्याचा जो प्रयत्न करेल थुंकी त्यांच्याच तोंडावर उडेल. हेही टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं अशी टीका त्यांनी केली आहे.
FAQs :
1. वादाची सुरुवात कशामुळे झाली?
पैशांच्या बॅगेवरून रवींद्र चव्हाण यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे वादाला सुरुवात झाली.
2. चव्हाणांची बाजू कोणी घेतली?
शिवसेना नेते योगेश कदम यांनी चव्हाणांना साफ पाठिंबा दिला आहे.
3. अशिष शेलारांची प्रतिक्रिया काय होती?
शेलार यांनी निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यावर पलटवार करत आरोपांपूर्वी विचार करावा असे म्हटले.
4. राणे आणि केसरकर यांनी काय आरोप केले होते?
त्यांनी वादग्रस्त पैशांच्या बॅग प्रकरणासाठी रवींद्र चव्हाणांना जबाबदार मानले.
5. या वादाचा युतीवर काही परिणाम झाला का?
होय, कोकणात भाजप–शिवसेनेतील तणाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.