

Chhatrapati Sambhajinagar News : आक्षेप नसलेल्या नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांचा बुधवारी (ता. 3) निकाल आहे. मात्र, ज्या ठिकाणी आक्षेप आले, त्या ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी घेण्याचा सुधारित आदेश निवडणूक आयोगाने काढला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठात दरम्यान, याचिकांच्या अनुषंगाने सोमवारी (ता. 1) सुनावणी झाली. यात दोन्ही टप्प्यांचा निकाल 21 डिसेंबरला एकाच वेळी लावता येईल का, अशी विचारणा न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेणेगावकर यांनी केली.
त्यावर निवडणूक आयोगाचे वकील ॲड. सचिंद्र शेट्ये यांनी मंगळवारी (ता. दोन) निवेदन करण्यात येईल, असे सांगितले. राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या 4 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मतदान 2 डिसेंबरला, तर मतमोजणी 3 डिसेंबरला ठरल्यानुसार होणार आहे. मात्र, जिथे आक्षेप आहेत, त्यांच्यासाठी सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान काही याचिकांमध्ये सर्व निकाल एकत्रित घोषित करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार आयोगाचे वकील शेट्ये यांनी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता निवेदन करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे आज पुन्हा सुनावणी होणार आहे.
याचिककर्त्यांकडून वरिष्ठ वकील व्ही.डी. साळुंके, ॲड. एन.पी. पाटील जमालपूरकर, ॲड. राहुल टेमक, ॲड. श्रीगोपाल डोड्या, ॲड. शुभांगी मोरे तर सरकारकडून ॲड. सुभाष तांबे आणि निवडणूक आयोगाकडून ॲड. सचिन शेट्ये यांनी युक्तिवाद केला.
खंडपीठात पैठण, कोपरगाव, अंबाजोगाई, उदगीर येथील याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल करत आक्षेप घेतलेले आहेत. सर्व याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर पूर्वीच्या कार्यक्रमानुसार मंगळवारी होणाऱ्या निवडणुकांची संपूर्ण तयारी झाली, निवडणूक अधिकारी आणि संबंधित सर्व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोचल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या बाबींचा विचार करून, खंडपीठाने जेथे निवडणूक (Election) आहे तिथे ठरल्याप्रमाणे निवडणुका घेण्यास परवानगी देत, त्यावर कुठलाही आदेश दिला नाही. मात्र, दोन टप्प्यातील निवडणुकांची मतमोजणी एकत्र घेण्यावर प्रदीर्घ सुनावणी झाली. पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर केला तर नंतर होणाऱ्या निवडणुका प्रभावित होतील, असे मुद्दे याचिकाकर्त्यांनी उपस्थित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.