Shiv Sena UBT news : कथित अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे राज्यभरात चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा नियोजन समितीत मंजूर केलेली पण अद्यापही निविदा न निघालेली कामे रद्द करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.
हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर झिरवाळ यांनी जिल्हा मागास असल्याने आपल्याला या जिल्ह्याचे पालकमंत्री केले, असे विधान केले होते. तेव्हापासून ते अपवाद वगळता जिल्ह्यात कधी फिरकलेच नाहीत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन बैठका घेण्यावर त्यांचा अधिक भर राहिला. त्यांच्या या ऑनलाइन कारभारामुळे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधीही त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले.
नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर केलेली परंतु अद्यापही निविदा न काढलेली कामे रद्द करावीत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय पाटील यांनी केली आहे. पालकमंत्र्यांनी मंजूर केलेली अनेक कामे ही कुठल्या निकषाच्या आधारांवर मंजूर केली? याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. प्रशासकीय अधिकारीही याबाबत ठोस काही सांगण्यास तयार नाहीत.
अनेक कामांना मंजुरी देण्यात आली असली तरी त्या कामांच्या निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अशी कामे रद्द करावी किंवा त्याची नव्याने तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हाप्रमुख अजय पाटील यांनी निधी वितरणाचा शेवटचा टप्पा असल्याने अनेक बाबतीत पालकमंत्र्यांच्या मान्यतेची आणि सूचनांची आवश्यकता असल्याचे सांगीतले. मात्र ते प्रत्यक्षात जिल्ह्यात येत नसल्यामुळे सगळी कामे रखडली आहेत, असा आरोपही केला.
पालकमंत्री असूनही विविध शासकीय कार्यक्रमांपासून नरहरी झिरवाळ हे लांबच राहिले. त्यांचा जोर कायम ऑनलाईन बैठका घेण्यावरच राहिला. त्याचा परिणाम हिंगोली जिल्ह्यातील विकासकामे रखडण्यावर झाल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.