

Marathwada news : भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पाच टर्म खासदार पदाच्या कार्यकाळातील मोठी उपलब्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना ड्रायपोर्ट संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. हा ड्रायपोर्ट सुरू होण्याआधीच महसूल विभागाने त्याला सील ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जालन्याच्या तहसीलदार छाया थोरात यांनी ड्रायपोर्ट प्राधिकरणाकडे थकीत 85 लाखांच्या जमीन महसुल वसुलासाठी ही कारवाई केल्याचे सांगितले जाते. जालना शहराजवळील दरेगाव शिवारात 495 एकरांवर हा ड्रायपोर्ट उभारण्यात आला आहे. मराठवाड्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या या ड्रायपोर्टला सुरू होण्याआधीच ग्रहण लागले आहे.
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड यांनी संयुक्तपणे एस पी व्ही नागपूर एम ए एल पी लिपीटेड मार्फत हा ड्रायपोर्ट विकसित केला आहे. चंद्रपूर येथील एका कंपनीला पंधरा वर्षासाठी तो चालवण्यासाठी देण्यात आला आहे. या ड्रायपोर्टमध्ये अजून कंटेनर यार्ड, वेअर हाऊस, कंटेनर लिफ्टिंग ट्रक टर्मिनस आदी सुविधा निर्माण व्हायच्या आहेत.
दरम्यान, ड्रायपोर्ट प्राधिकरणाकडे 85 लाखांचा जमीन महसूल थकल्याच्या कारणाने वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तहसीलदार छाया थोरात यांच्या पथकाने शुक्रवारी 27 मार्च रोजी या ड्रायपोर्टला सील ठोकले. थकबाकी वसूल झाल्याशिवाय सील काढण्यात येणार नाही, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणी ड्रायपोर्ट प्राधिकरणचे व्यवस्थापक विकास मलिक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, दरेगाव व बदनापूर तालुक्यातील जवसगाव शिवारात ड्रायपोर्ट असून दोन्ही ठिकाणचे 85 लाख रुपये थकले आहेत. फाइल मंजुरीसाठी पाठवली आहे. सोमवारपर्यंत हा विषय मार्गी लागेल.