Sanjay Shirsat-Uddhav Thackeray-Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat : 'शरद पवारांनी हात काढला; तर उबाठाची विधानसभेला दयनीय अवस्था होईल...'

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar, 18 July : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत अनेक घडामोडी घडतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाला जास्त जागा देण्याला काँग्रेसचा विरोध राहील आणि ठाकरेंची शिवसेना-काँग्रेस यांच्यात बिघाडी होईल. शरद पवारांनी उबाठा गटाच्या पाठीवर असलेला हात काढला, तर त्यांची दयनीय अवस्था होईल. येणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा काँग्रेसच्या जागा वाढतील, अशी भविष्यवाणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार होणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. म्हणजे विस्तार होणार, पण तो कधी आणि केव्हा होणार हे कोणीच सांगू शकत नाही, असेही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.

महायुती सरकारने राज्यात लाडकी बहिण योजना लागू केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावासाठी काही नाही का? अशी टीका करायला सुरूवात केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी काल लाडक्या भावांसाठी योजना जाहीर करून टाकली. यावरही महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना उबाठाकडून जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला.

पंधराशे रुपयांत काहीच होत नाही, हे आम्हालाही माहित आहे. पण, आम्ही ते तरी देण्याची दानत दाखवली. तुमचे सरकार असताना तुम्ही जनतेला काय दिले हे एकदा सांगा, असे आव्हान शिरसाट यांनी दिले.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वाईट स्थिती होणार आहे. या पक्षाच्या जागा घटतील, एकवेळ काँग्रेसच्या वाढतील, असे सांगतानाच शरद पवारांनी हात काढल, तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष तळाला जाईल, असेही शिरसाट म्हणाले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेतूनच सुटू शकतो. मनोज जरांगे पाटील यांनी कोणाशी चर्चा केली, कोणाला बोलावले याला महत्वच नाही. राज्यात शांतता राहिली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा असल्याचे शिरसाट म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांचा वापर करत अफझल खानाचा कोथळा काढला, ती वाघनखे महाराष्ट्रात आणली, याचे कौतुक व्हायला पाहिजे. पण विरोधक त्यावर टीका करत आहेत, हा शिवप्रेमींचा आणि हिंदुत्वाचा अपमान असल्याचे शिरसाट म्हणाले.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT