AIMIM leader Imtiaz Jaleel announces Sher Khan Haji Abdul Rehman as party group leader in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation after strong electoral performance. Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : एमआयएमकडे सर्वाधिक तरुण नगरसेवक, पण गटनेतेपदी वरिष्ठ अनुभवी शेरखान हाजी अब्दुल रहमान यांची बाजी

AIMIM Group Leader : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एमआयएमकडे मोठी तरुण ताकद असतानाही इम्तियाज जलील यांनी अनुभवाला प्राधान्य देत शेरखान हाजी अब्दुल रहमान यांची गटनेतेपदी निवड केली.

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमने छत्रपती संभाजीनगर महापालिकेत जोरदार मुसंडी मारली. 22 माजी नगरसेवकांचे तिकीट कापण्याचे धाडस इम्तियाज जलील यांच्या अंगलट येते की काय? अशी शंका निवडणुक प्रचारा दरम्यान, त्यांना झालेला विरोध, धक्काबुक्की आणि हल्ल्याच्या घटनेनंतर आली होती. पण मतदारांनी याचा वचपा ईव्हीएमवर पतंगाचे बटन दाबत काढला. 33 नगरसेवकांसह एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

सर्वाधिक तरूण चेहरे या निवडणुकीत एमआयएमने दिले होते. मात्र सभागृहात पक्षाची जबाबदारी देताना इम्तियाज जलील यांनी मात्र वयस्कर आणि अनुभवी चेहऱ्याला संधी देत सगळ्यांनाच धक्का दिला. पक्षाने शेरखान हाजी अब्दुल रहमान यांची आज महापालिकेतील पक्षाच्या गटनेते पदी निवड जाहीर केली. ते किराडपुरा-रहेमानिया काॅलनी प्रभाग क्रंमाक 13 मधून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. पक्षाकडे अनेक तरूण चेहरे असताना पक्षाने अनुभवी चेहऱ्याला पसंती देत समन्वय साधल्याचे दिसून आले आहे.

महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना वेग आला असून, या निवडीकडे त्याचाच भाग म्हणून पाहिले जात आहे. मागील महापालिका निवडणुकीत एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली ताकद दाखवून दिली होती. शहरातील मुस्लिमबहुल भागांसह काही मिश्र वस्तीच्या प्रभागांमध्ये पक्षाने भक्कम पकड निर्माण केली. नशा मुक्ती, गुटखा विरोधात पक्षाने वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महापालिकेतील एमआयएमच्या यशामागे खासदार इम्तियाज जलील यांचे नेतृत्व निर्णायक ठरले. शहराच्या राजकारणात स्पष्ट भूमिका, आक्रमक वक्तृत्व आणि विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित राजकारण ही त्यांची ओळख आहे. खासदारकीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पक्षाची दिशा ठरवण्यात त्यांचा प्रभाव कायम दिसून आला. महापालिकेतील नगरसेवकांना एकत्र ठेवणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शहराशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेणे, यामुळे एमआयएमची ओळख आता केवळ एका विशिष्ट मतदारवर्गापुरती मर्यादित राहिलेली नाही.

सध्याच्या महापालिकेत एमआयएमचे संख्याबळ 33 आहे. या नगरसेवकांच्या माध्यमातून पक्ष ठरवून दिलेल्या अजेंड्यानूसार पुढे काम करणार आहे. अशावेळी परिस्थितीत गटनेतेपदाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. शेर खान हाजी अब्दुल रहमान यांची निवड ही पक्षातील अनुभवी आणि आक्रमक चेहऱ्याला जबाबदारी देण्याचा निर्णय मानला जात आहे. नवीन गटनेतेपदी निवड झाल्यानंतर महापालिका सभागृहात एमआयएमची भूमिका अधिक ठाम आणि समन्वयाने मांडली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात महापालिका निवडणुका, शहर विकासाचे प्रश्न आणि राजकीय समीकरणे लक्षात घेता, ही निवड एमआयएमसाठी रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

विरोधी पक्षनेते पदासाठी चुरस..

एमआयएमने (AIMIM) गटनेता जाहीर केल्यानंतर आता महापालिकेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी पक्षात मोठी स्पर्धा असणार आहे. यामध्ये समीर साजेद बिल्डर, फिरोज खान, काकासाहेब काकडे तर महिलांमधूनही विजयश्री जाधव यांचे नाव समोर येत आहेत. गटनेते शेर खान हाजी अब्दुल रहमान आणि नव्या विरोधी पक्ष नेत्यावर शिवसेना, भाजप या सत्ताधाऱ्यांना मनमानी कारभारापासून रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT