AIMIM News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पाच दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करत आहेत. लोकशाही मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत असलेले दीडशेहून अधिक मराठा आमदार काय करत आहेत? असा सवाल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला. या सगळ्या आमदारांनी आपले राजीनामे जरांगे पाटील यांच्या चरणी अर्पण केले पाहिजेत, समाजासाठी एवढं तर करू शकता ना? असा टोलाही त्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवणाऱ्या मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना केला.
इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आज आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. सरकार न्यायालयाच्या आडून मनोज जरांगे यांचे आंदोलन दडपू पाहत असल्याचा आरोप करत त्यांनी आम्ही या लढ्यात खांद्याला खांदा लावून सोबत असल्याची ग्वाही देखील दिली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार मुद्दाम रखडवत असल्याचा आरोप करताना या लढ्यापासून लांब राहणाऱ्या मराठा आमदार, खासदारांनाही फटकारले. महाराष्ट्राच्या विधानसभेत असलेल्या मराठा आमदारांपैकी शंभर जणांनी जरी आपले राजीनामे दिले, तर फडणवीस दहा दिवसात निर्णय घेतील, असा दावाही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीतून मराठा आरक्षण (Maratha Reservation) मागणीला एमआयएमने सुरूवातीपासून आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अगदी अंतरवाली सराटीत जाऊन इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाच्या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास दिला होता. आमचे मोठे भाऊ म्हणून आधी तुमच्या लढ्यात आम्ही सहभागी होऊ, नंतर मुस्लिम आरक्षणासाठी भांडू अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा दिला होता. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याचे कौतुक करत त्यांनी संपूर्ण समाजाला एकत्र आणल्याचे म्हटले होते.
मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण व इतर पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. एवढेच नाही तर मुंबईत आलेल्या आंदोलकांच्या जेवणाची, पाण्याची सोय देखील केली होती. त्यानंतर आज इम्तियाज जलील यांनी मुंबईत गाठत आंदोलनस्थळी भेट देत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देतानाच त्यांनी मराठा आमदारांना चांगलेच सुनावले.
'तुम्हाला करायचं की नाही करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे .जेव्हा तुम्हाला काही करायचं नसतं तेव्हा तुम्ही समिती गठीत करता. समितीवर समिती हे धंदे सुरू आहेत, काहीतरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं होतं. अपेक्षा ही होती की उच्च न्यायालयाने हे आदेश सरकारला द्यायला पाहिजे होते. या लोकांची मागणी नक्की काय आहे ? मागच्या एवढ्या वर्षांपासून हे लोक रस्त्यावर उतरत आहेत लढत आहेत. आंदोलन करत आहेत, मग त्यांना न्याय का मिळत नाही ? हे हायकोर्टाने सांगायला पाहिजे होते, अशी आमची अपेक्षा होती .'
तर फडणवीस दहा दिवसात निर्णय घेतील..
रस्त्यावर आलेले हे सगळे लोक ग्रामीण भागातून आलेले आहेत .अस्सल मराठा महाराष्ट्रीय लोक इथे आले आहेत. या लोकांनी विधानसभा आणि लोकसभेमध्ये आपल्या लोकांना पाठवला आहे .हे रस्त्यावर बसणार , त्रास सहन करणार .आणि यांचे मोठे नेते एसी मध्ये बसून झोपा काढणार. माझी विनंती जरांगे पाटलांना आणि त्यांच्या सर्व समर्थकांना आहे की मराठा समाजाच्या सगळ्या आमदार, खासदारांना उचलून आणा. आणि जरांगे पाटलांच्या चरणापाशी तुमचा राजीनामा द्या, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले.
यातून एक संदेश पाठवा आम्हाला समाजाशी देणंघेणं आहे, बाकी खुर्चीशी नाही. कमीत कमी ज्या समाजाची लढाई इथे सुरू आहे त्यांनी तरी किमान सुरुवात करावी, असेही इम्तियाज जलील म्हणाले. दीडशेच्या जवळपास आमदार आहेत मराठा समाजातले. मुस्लिम समाजासाठी हायकोर्टाने पाच टक्के आरक्षण शिक्षणासाठी दिले होते. मी जरांगे पाटलांना स्वतः सांगितले होते की आज आम्ही तुमच्यासोबत पूर्ण ताकदीने लढणार आहेत. तुम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर आमचीही अपेक्षाही आहे जेव्हा आम्ही आमच्या पाच टक्के आरक्षणासाठी लढाई सुरू करू तेव्हा त्याच ताकदीने तुम्ही आमच्या मागे उभे रहा, असेही इम्तियाज जलील यांनी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.