Marathwada AIMIM News : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, याची चाहूल लागणाऱ्या घटना, घडामोडी जिल्ह्याच्या राजकारणात घडतांना दिसत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर आज जालना-मुंबई या नव्या आणि राज्यातील सहाव्या `वंदे मातरम` ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. (Imtiaz Jaleel News) कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला निमंत्रण पत्रिकेतून छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांचे नाव वगळल्याचा प्रकार समोर आला.
एरव्ही इम्तियाज जलील रेल्वेच्या अनेक कार्यक्रमात व्यासपीठावर दिसले. कधी काळे कपडे घालून कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे ते चर्चेत आले, तर कधी (BJP) भाजपच्या नेत्यांसमोरच त्यांच्याच पक्षाचे वाभाडे काढत इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांनी लक्ष वेधल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कार्यक्रमाला इम्तियाज जलील काळे कपडे घालून गेले होते.
वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्यातील सर्व आमदार, मराठवाड्यातील खासदारांची नावे असताना इम्तियाज यांचे नाव डावलून भाजपने कोतेपणाचे प्रदर्शन घडवल्याची टीका आता होऊ लागली आहे. (AIMIM) तर नावावरून भाजप प्रमाणे एमआयएमनेही राजकारणच केल्याचा सूर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकाबाहेर आणि नंतर आत झालेल्या घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखवण्याच्या प्रकारानंतर निघत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इम्तियाज जलील यांच्याकडे एक अभ्यासू, सभागृहात आपल्या मतदारसंघातील प्रश्न पोटतिडकीने मांडणारे खासदार म्हणून आहे. विरोध पक्षाचे खासदार असल्यामुळे त्यांना जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यात किती यश आले, याचे मोजमाप करता येणार नसले तरी त्यांनी सभागृहात आवाज उठवला हे नाकारून चालणार नाही. निमंत्रण पत्रिकेत इम्तियाज यांचे नाव डावलण्यात आले? की ते अनावधानाने राहिले? डावलण्यात आले असेल तर कोणाच्या सांगण्यावरून ? दक्षिण रेल्वेकडून ही चूक झाली का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत केले जात आहेत.
मुळात नाव डावलले नसते तर इम्तियाज जलील आणि त्यांच्या समर्थकांना निदर्शने करण्याची संधीच मिळाली नसती. इम्तियाज यांनी आरोप करत जाब विचारल्यानंतर काही तासांत नव्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या, त्या इम्तियाज जलील आणि कन्नडचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांचेही नाव आले. त्यामुळे नावात काय? असे म्हटले जात असले तरी ते डावलण्यामुळे कसे महाभारत घडू शकते? हे आज छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकात पाहायला मिळाले.
छोट्या गोष्टींना महत्व देत नाही, असे म्हणत इम्तियाज यांनी ही गोष्ट मोठी करत भाजप आणि रेल्वे प्रशासनाला त्यांच्या झालेल्या चुकीची जाणीव करून दिली. अर्थात काही मिनिटांचे नाराजी नाट्या इकडे सुरू असतांना तिकडे जालना येथील `वंदे भारत` ट्रेनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, बबनराव लोणीकर, माजी आमदार अर्जुन खोतकर अशा सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांना एकत्रित आणत रावसाहेब दानवे यांनी बाजी मारली.
'बी' टीम नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न ?
छत्रपती संभाजीनगरमधून आम्हाला निवडून यायचे असेल तर इम्तियाज जलील यांना उभे करावे लागेल, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी दिशा समितीच्या बैठकीत खळबळ उडवून दिली होती. विशेष म्हणजे इम्तियाज जलील यांच्या शेजारी बसूनच दानवे यांनी हे विधान केले होते. यावर इम्तियाज यांनी हसत त्यांना दाद दिली होती. एमआयएम ही भाजपची `बी` टीम आहे, असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातो.
हा आरोप खोडून काढण्यासाठीच जलील यांनी 'आम्हाला महाविकास आघाडीत घ्या' अशी गुगली टाकली होती. आता लोकसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आल्या आहेत. अशावेळी आम्ही भाजपची 'बी' टीम नाही, हे दाखवून देण्यासाठी मिळालेली संधी एमआयएम कशी दवडणार? इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन, निदर्शने हा त्याचाच भाग होता? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होतांना दिसते आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.