Aimim News : शहरातील शहागंज भागात काही हाॅकर्सकडून एका महिला व तिच्या पतीला मारहाण झाली. ही दुर्दैवी घटना आहे, त्याचे समर्थन कोणीही करणार नाही. पण काही लोकांच्या चुकीची शिक्षा सगळ्या हाॅकर्सना देणे चुकीचे आहे. माझ्या नगरसेवकांना मतदारांनी घरात बसण्यासाठी नाही, तर अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी निवडून दिले आहे. महापालिका आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली माझ्या तेरा नगरसवेकांविरुद्ध गुन्हे दाखल करत कारवाई सुरू केली आहे.
त्यांना जी कारवाई करायची ती त्यांनी करावी, जे नगरसेवक घटनास्थळी नव्हते, त्यांची नावे कोणाच्या दबावात टाकण्यात आली? असा सवाल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला. कारवाई चुकीचे आहे हे आम्ही सिद्ध करूच, पण माझ्या एकाही नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई झाली तर मी अधिकाऱ्यांनाही सोडणार नाही, असा इशारा देतानाच लवकरच आपण महापालिका प्रशासनाच्या गैरकारभाराचा मोठा बाॅम्ब फोडणार असल्याचा दावाही इम्तियाज जलील यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत 33 नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या एमआयएमच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. शहागंज भागातील अतिक्रमण हटाव पथकाच्या कारवाईला विरोध करत फळ विक्रेत्यांना पुन्हा रस्त्यावर गाड्या लावण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी महापालिका प्रशासनाने एमआयएमच्या तेरा नगरसेवकांविरुद्ध कारवाईचा बडगा उभारला. उपायुक्त सविता सोनवणे यांच्या तक्रारीवरून पोलीसांत ते नगरसेवक आणि त्यांच्या काही नातेवाईकांविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत.
यानंतर आता महापालिका अधिनियम 10 ड (1) नूसार एमआयएमच्या नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी अपात्रतेची कारवाई प्रस्तावित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावर इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना भूमिका स्पष्ट केली. माझा एकही नगरसेवक अपात्र ठरला तर मी एकाही अधिकार्याला स्वस्थ बसू देणार नाही. त्याच्या अनेक कारनाम्यांचा कच्चाचिठ्ठा आमच्याकडे आहे. लवकरच मी या संदर्भात मोठा बाॅम्ब फोडणार आहे.
आमच्या नगरसेवकांवर प्रशासनाने चुकीची कारवाई केली आहे. हे आम्ही न्यायालयात सिध्द करू. अतिक्रमण हटाव पथकाला विरोध करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा कायदा व नियम प्रशासन आणि आयुक्तांना माहित आहे. पण याच लोकांना प्रत्येक शहरात केंद्राच्या कायद्यानूसार हाॅकर्स झोन असणे बंधनकारक आहे याचा मात्र सोयीस्कर विसर पडला आहे. तुम्ही हाॅकर्सना व्यवसाय करण्यासाठी जागा देणार नाही, त्यांच्याकडून हप्ते घेणार आणि वर कारवाईही करणार हे कसे चालेल?
मी केंद्राच्या अर्बन डेव्हलपमेंट कमिटीवर असताना याच मुद्यावरून अनेक राज्यातील महापालिका आयुक्तांवर कारवाया केल्या आहेत. आधी हाॅकर्स झोन करून त्यांना हक्काची जागा द्या, त्यानंतर जर त्यांनी नियम मोडले तर निश्चित कारवाई करा, त्याला कोणाचाही विरोध नसेल, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. पण एखाद्या घटनेच्या आडून रमजानच्या महिन्यात फळ विक्रेते, छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणे चुकीचे आहे. रमजान, दिवाळी सारखे मोठे सण असतात ज्या काळात छोट्या व्यावसायिक, हाॅकर्संना दोन पैसे कमावण्याची संधी असते. त्याच काळात चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असेल तर आम्ही शांतपणे बघत बसायचे का? असा सवाल इम्तियाज यांनी केला.
महापालिका प्रशासनाने आमच्या ज्या तेरा नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले आहेत, त्यापैकी काही तर प्रत्यक्ष घटनास्थळावर हजरही नव्हते. मग पराभूत उमेदवारांच्या सांगण्यावरून प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करत गुन्हे दाखल केले का? तुम्ही कारवाई करा, आम्ही ती चुकीची असल्याचे सिद्ध करू, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी प्रशासनाला आव्हान दिले.
आमच्या पक्षाकडून सर्वाधिक तरूण नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांच्यासह सगळ्याच नगरसेवकांना मी संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही तरूण नगरसेवक हे रिलच्या प्रेमात पडले आहेत, त्यातून अडचणी वाढतात, त्यांनाही समज दिली आहे. महापालिका प्रशासनाच्या कुठल्याही कारवाईला आम्ही घाबरणार नाही, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.