

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला कारवाई करण्यास मज्जाव करत हुसकावून लावणे एमआयएमच्या 11 नगरसेवकांना चांगलेच महागात पडले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज भागात रस्त्यावर अतिक्रमण करत फळ विक्री करणाऱ्या काही विक्रेत्यांनी चार दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेसह तिच्या पतीला व दिराला जबर मारहाण केली होती. याशिवाय एका फळ विक्रेत्या महिलेलाही मारहाण झाली होती.
त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांनी महापालिकेच्या आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे शहागंज मधील फळ विक्रेत्यांचे व इतर व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण पथकाचे उपायुक्त वाहूळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली.
ऐन रमजान महिन्यात अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केल्यामुळे फळ विक्रेते व शहागंज भागातील व्यापारी संतापले होते. केवळ मुस्लिम फळ विक्रेते व व्यापाऱ्यांचीच अतिक्रमणे काढली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी निवडणुकीत मत मागण्यासाठी येणारे एमआयएमचे नगरसेवक आता कुठे आहेत? असा संताप काही विक्रेत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरत अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जाते.
त्यानंतरच एमआयएमचे नगरसेवक शहागंज परिसरात रस्त्यावर आले आणि त्यांनी फळ विक्रेत्यांना पुन्हा गाड्या लावण्यास प्रवृत्त केले. याशिवाय गस्तीवर असलेल्या अतिक्रमण हटाव पथकाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत तिथून उसकावूनही लावले.
एमआयएमचे विरोधी पक्षनेते अब्दुल साजिद समीर यांनी 'अब प्रशासकराज नही है, गया वो डर प्रशासक का, महापालिका किसी के बाप की जागीर नही' अशी भाषा वापरत फळ विक्रेत्यांना अतिक्रमण करण्यास प्रवृत्त केले होते. दरम्यान एमआयएमच्या या मुजोरीमुळे सत्ताधारी शिवसेनेमध्ये संतापाचे वातावरण होते. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेत बाधा आणणाऱ्या नगरसेवकांवर पद रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी आपण पत्र पाठवून आयुक्तांकडे करणार आहोत, असे म्हटले होते.
काल दिवसभर एमआयएम नगरसेवकांवर कारवाईचा बडगा उभारण्यासाठी चर्चा व हालचाली सुरू होत्या. अखेर महापालिकेच्या उपायुक्त सविता सोनवणे यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिसांनी 11 नगरसेवक आणि तीन नगरसेवकांच्या नातेवाईकांसह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकांमध्ये एमआयएमचे विरोधी पक्ष नेते अब्दुल समीर साजिद, नगरसेवक सय्यद ओसामा अब्दुल कदीर, काकासाहेब दामोदर काकडे, अकील अहमद (नगरसेविका तरन्नू अखिल अहमद यांचे पती) फिरोज खान मोईन उद्दीन खान, मेराज खान जलील खान, मोहम्मद वाजेद जागीरदार, सोहेल कुरेशी, मुनशी पटेल, मोहम्मद वसीम अलीम, अहमद मतीन पटेल साबिर (नगरसेविका फर्जना गुलाम रसूल यांचे जावई), सलीम सहारा (नगरसेविका नर्गिस फातिमा यांचे पती), अमजत चाचू (नगरसेविका खान अल्मास यांचे वडील) यांच्यासह इतर तीस ते चाळीस जणांचा यात समावेश आहे.
या सर्वांवर भारतीय न्याय संहिता बीएनएस 221, सरकारी कामात अडथळा आणणे, बीएनएस 224 कर्मचाऱ्यांना धमकी देणे, बीएनएस 352 (2), गुन्हेगारी स्वरूपाची धमकी, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने केलेली शिवीगाळ, जाती धर्माच्या नावावर इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह सर्व प्रकारे खोटी माहिती अथवा अफवा पसरवणे, प्रतिष्ठेला हानी पोहोचेल असे बदनामीकारक वक्तव्य करणे, बेकायदा व जमाव गोळा करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कलमान्वये तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा पाचशे रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही, दोन वर्षापर्यंत करावा किंवा दंड किंवा दोन्ही, तीन वर्षांपर्यंत कैद किंवा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.
महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 10 (1) ड प्रमाणे अतिक्रमण करणे, अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन देणे, अतिक्रमण कारवाईस विरोध अशी कृती केल्यास नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. दरम्यान एमआयएमच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाल्याने पक्षात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने केलेल्या कारवाईचे विरोधात आता नेमकी काय भूमिका घ्यायची? यावर पक्षात खल सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.