Chhatrapati Sambhajinagar, 23 March : गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने निवडून आलेले एमआयएमचे इम्तियाज जलील हे फेल खासदार आहेत. पाच वर्षांत त्यांना भरपूर काम करण्याची संधी होती. पण, त्यांना ते करता आले नाही. दुसरीकडे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांची अवस्था भाजपसोबत नसल्याने वाईटच आहे, असा दावा 2019 च्या निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.
इम्तियाज आणि खैरे या दोघांच्याही मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली असून, मला असलेला मराठा समाजाचा पाठिंबा आणि मिळालेली मते मात्र माझ्या पाठीशी कायम आहेत. कारण मी अपक्ष लढलो होतो, असे समर्थनही जाधव यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) छत्रपती संभाजीनगरातून निवडणूक लढवण्याचा अद्याप आपण विचार केलेला नाही. शांतिगिरी महाराज, मराठा समाजाची भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही, असे सांगत हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी आपण 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतल्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे, तर इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांना एमआयएमने दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्यामुळे साहजिकच 2019 च्या निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या हर्षवर्धन जाधव यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हर्षवर्धन यांनी निवडणूक लढवणार की नाही? हे स्पष्ट न करता इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांचे भविष्य वर्तवले. खैरे आतापर्यंत शिवसेना आणि भाजपची युती असल्यामुळे निवडून यायचे. गेल्या निवडणुकीत अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभूत झाल्यामुळे त्यांना सहानुभूती होती. मीही मध्यंतरी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. परंतु शिवसेनेत पडलेली फूट आणि भाजपची साथ नसल्यामुळे त्यांच्या मतांमध्ये विभागणी झाली आहे. उमेदवारी त्यांना मिळणार असली तरी त्यांची अवस्था वाईट आहे.
दुसरीकडे, इम्तियाज जलील गेल्या निवडणुकीत माझ्यामुळे निवडून आले, असा आरोप करत त्याचे खापर माझ्या माथी फोडणाऱ्या लोकांनी त्यांना गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितमुळे मिळालेली मते कसे विसरले? असा सवाल केला. या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यामुळे एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची अवस्था वाईट झाली आहे.
गेल्या पाच वर्षांत त्यांना खासदार म्हणून चांगले काम करण्याची संधी होती. ते जर त्यांनी केले असते तर शहरात आज लोकांना पंधरा दिवसांनंतर पाणी प्यायला मिळाले नसते. खासदार म्हणून ते फेल झाले आहेत. शिवाय वंचित बहुजन आघाडीसोबत नसल्यामुळे ते दीड ते दोन लाखांच्या वर मते मिळवू शकणार नाहीत, असा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला.
स्वतः निवडणूक लढणार का याबाबत मात्र ते स्पष्टपणे काही सांगत नाहीत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका, शांतिगिरी महाराज काय निर्णय घेतात, विनोद पाटील हे मैदानात उतरतात का? या सगळ्या गोष्टींवर माझे लक्ष आहे. या सगळ्या घडामोडींचा विचार केल्यानंतरच मी अंतिम निर्णय घेणार आहे, असेही हर्षवर्धन यांनी सांगितले.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.