MP Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

MP Imtiaz Jaleel Allegations News: माजी मंत्री सुभाष देसाई यांच्यासह एमआयडीसीच्या संचालकांवर गंभीर आरोप...

Chhatrapati Sambhajinagar Politics : ...ही परवानगी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह त्या काळातील मंत्री आणि एमआयडीसीच्या अधिकारी यांनी दिली.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : फाइव्ह स्टार शेंद्रा एमआयडीसीमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) अंतर्गत शेतकऱ्यांकडून प्रतिस्केवअर फूट शंभर रुपयांनी विकत घेतलेली 110 हेक्टर जमीन त्या कंपनीकडून परस्पर दुसऱ्या लोकांना प्लॉटिंग करून विकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

ज्या उद्देशाने जमीन घेतली, तिथे प्रकल्प सुरू न करता मोठ-मोठे होर्डिंग लावू हे प्लॉट विकण्यात येत आहेत. या 2017 मधील प्रक्रियेत तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, एमआयडीसीचे अधिकारी, सरकारमधील त्यावेळेचे अधिकारी यांचाही हात असल्याचा खळबळजनक आरोपही इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांनी पत्रकार परिषदेत केला.

2006 मध्ये अजंता फार्मा या कंपीनीला सेझ अंतर्गत 110 हेक्टर जमीन एमआयडीसीने दिली होती. त्यातील 30 एकर जमीन शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे परत देण्यात आली. या कंपनीतर्फे येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार होता. 2017 पर्यंत काहीच केले नाही. त्यानंतर या जमिनीचा सेझ रद्द झाल्यानंतर ती जमीन एमआयडीसीकडे परत करणे अपेक्षित होते. मात्र, अजंता फार्मा या कंपनीने इन्स्पिरा इन्फ्रा औरंगाबाद लिमिटेड नावाची कंपनी 2017 मध्ये स्थापन करून प्लॉटची विक्री करण्यासाठी परवानगी घेतली.

ही परवानगी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्यासह त्या काळातील मंत्री आणि एमआयडीसीच्या अधिकारी यांनी दिली. त्यातून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. एवढेच नाही तर जमिनीचा काही भाग समृद्धी महामार्गात गेल्याने त्याचा लाभही या कंपनीने घेतला असल्याचे समोर आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या जमिनीचे मायग्रेशन आणि कन्व्हेयशनसाठी सुभाष देसाई व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी 40 कोटी रुपये भरून देण्यासाठी चार हप्ते पाडून ही फिस भरण्यास मुदत दिली. केवळ 25 टक्केच रक्कम ही एमआयडीसीला येणार आहे. त्यात केवळ 11 कोटी रुपयेच भरले आहेत. जीएसटीही भरला नसल्याचा दावा इम्तियाज यांनी केला. या कंपनीने रेरालाही दुसरीच माहिती पाठवली आहे. आता प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जायचं का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

दोन कंपन्या परत गेल्या...

एकीकडे हा प्रकार तर दुसरीकडे शेंद्रा एमआयडीसीत गुंतवणूक करू पाहणाऱ्या कंपन्यांना मात्र जमीन मिळत नसल्याने परत जावे लागल्याचा दावाही इम्तियाज यांनी केला. 860 कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन अथर ही कंपनी शहरात येणार होती. नोव्हेंबर 2022 मध्ये याची माहिती उद्योग संघटना, काही लोकांनी दिली. मात्र, त्यांना शेंद्रा एमआयडीसीत जागा मिळाली नाही.

महिनाभरापूर्वी टोयाटो कंपनीचे मोठे अधिकारीही शहरात येऊन गेले. त्यांनी शेंद्रा येथे जमीन मागितली पण त्यांनाही जमीन मिळाली नाही. यासह इको लॅब नावाच्या कंपनीलाही जमीन मिळाली नाही म्हणून दुसरीकडे जावे लागले. आता या कंपनीला बिडकीनमध्ये जा असे सांगण्यात आल्याची माहिती आहे. सेझच्या नावाखाली घेतलेली जमीन उपलब्ध असती, तर प्रकल्प इथे आले असते. याविषयी उद्योग संघटनाही गप्प असल्याची टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT