Ambadas Danve Meet Uddhav Thackeray News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena : ठाकरेंना मोठा धक्का! अंबादास दानवे शिवसेनेच्या वाटेवर? शिवसेनेच्या नेत्याने राजकीय बॉम्ब फोडला

Uday Samant claims Over Ambadas Danve Political Swich : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

Jagdish Pansare

  1. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे लवकरच शिवसेनेत सामील होतील असा दावा केला.

  2. उबाठा गटाचे नेतृत्व सक्षम नसल्यामुळे नगरसेवक पक्ष सोडत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

  3. या वक्तव्यामुळे शिवसेना आणि उबाठा गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

Shivsena news : 'उबाठा' चे नेते अंबादास दानवे हे सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. परंतु त्यांच्या टीकेला मीडियाने फार सिरीयस घेऊ नये, कारण लवकरच ते तुम्हाला आमच्या सोबत दिसतील. आमच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे, असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत केला. नेतृत्व सक्षम नसल्यामुळेच 'उबाठा'चे निवडून आलेले नगरसेवक पक्ष सोडत आहेत, असा टोलाही सामंत यांनी लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे सातत्याने एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवतात. महायुती आणि त्यांच्या घटक पक्षांना सातत्याने अंगावर घेत समाज माध्यम आणि जाहीरपणे थोपवन्याचे काम अंबादास दानवे करत आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना फोडण्याचचे प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू आहेत. यावर अंबादास दानवे यांनी कडाडून टीका केली होती. या संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांना जेव्हा माध्यमांनी बोलते केले, तेव्हा मात्र सामंत यांनी वेगळाच दावा केला. अंबादास दानवे हे कायम आमच्यावर टीका करत असतात परंतु यामागे त्यांचा हेतू आपल्या नेत्यांचा विश्वास टिकून ठेवणे हा असतो.

अंबादास दानवे यांच्या टीकेला माध्यमांनी फारसे सिरीयस घेऊ नये. कारण थोड्याच दिवसात अंबादास दानवे तुम्हाला आमच्या सोबत दिसतील, त्याची प्रोसेस सुरू झाली आहे, असा खळबळजनक दावा उदय सामंत यांनी केला. अंबादास दानवे हे जालना- संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून विधान परिषदेवर निवडून गेले होते. सर्वाधिक मताधिक्याने विधान परिषदेवर निवडून जाण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. एमआयएमच्या नगरसेवकांनी अंबादास दानवे यांना मदत केली होती, असा आरोप त्यावेळी त्यांच्यावर झाला जातो.

छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचे तब्बल दोन दशकांपासून ते जिल्हाप्रमुख आहेत. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा त्यानंतरच्या विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायत,महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जात आहेत. जिल्ह्यातील दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांना मागे टाकत अंबादास दानवे यांनी मातोश्रीवर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आमदार असलेल्या अंबादास दानवे यांची जणू लॉटरी लागली. त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद म्हणून जबाबदारी मिळाली.

त्यांना संधी मिळाल्यानंतर अडीच- तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी महायुतीला सभागृहात सळोकी पळू करून सोडले होते. उद्धव ठाकरे यांचा विश्वास अंबादास दानवे यांनी सार्थ ठरवत सत्ताधाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याची भूमिका विरोधी पक्षनेता म्हणून ठेवली. काही महिन्यांपूर्वीच अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपला. यावेळी त्यांना निरोप देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांची कौतुक करत त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देताना आपल्या पक्षात येण्यासाठी ऑफरही दिली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर अंबादास दानवे हे मूळचे आमचेच आहेत ते यापूर्वी भाजपमध्ये होते, असे सांगत दानवे यांना भविष्यात आम्ही योग्य संधी देऊ असे संकेत दिले होते. तर एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांना विधान परिषदेत केलेल्या मदतीची आठवण करून देत गळ टाकला होता.

अंबादास दानवे यांचे ते शब्द खरे ठरणार का?

अंबादास दानवे यांनीही आपल्या निरोपाच्या भाषणात भविष्यातही आपण या सभागृहात दिसू पण कोणत्या पक्षाकडून हे सांगता येणार नाही, असे म्हणत पक्षांतराचे संकेत दिले होते. परंतु विधान परिषदेतील कार्यकाळ आणि विरोधी पक्षनेते पद संपुष्टात आल्यानंतर अंबादास दानवे गेल्या पाच सहा महिन्यापासून सरकार विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नगरपालिका, नगरपंचायत आणि नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मराठवाड्यात त्यांच्या नेतृत्वात पक्षाला यश मिळू शकले नाही.

तरीही छत्रपती संभाजीनगर व जालना महापालिकेत उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्यावरच विश्वास दाखवला. या दोन्ही महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाताहत झाली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे नेतृत्व बदलणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे नेतृत्व आपण आपल्या हाती घेणार,असा दावाही केला होता. परंतु पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी अंबादास दानवे यांच्याच खांद्यावर टाकली.

एकीकडे उद्धव ठाकरे यांचा अंबादास दानवे यांच्यावर प्रचंड विश्वास तर दुसरीकडे विरोधकांकडून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना हवा दिली जात आहे. मंत्री उदय सामंत यांच्या दाव्यानंतर अंबादास दानवे खरंच उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

FAQs :

1) उदय सामंत यांनी कोणता दावा केला?
👉 अंबादास दानवे लवकरच शिवसेनेत सामील होतील असा दावा त्यांनी केला.

2) उदय सामंत यांनी हे वक्तव्य कुठे केले?
👉 रत्नागिरी येथे त्यांनी हे वक्तव्य केले.

3) उबाठा गटावर सामंतांनी कोणता आरोप केला?
👉 नेतृत्व सक्षम नसल्यामुळे नगरसेवक पक्ष सोडत असल्याचा आरोप केला.

4) अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे का?
👉 सध्या त्यांच्या अधिकृत प्रतिक्रियेची माहिती समोर आलेली नाही.

5) या वक्तव्यामुळे राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
👉 शिवसेना आणि उबाठा गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT