

महायुती सरकार स्थापन होऊन वर्ष उलटले तरी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या डावपेचांमुळे हा वाद अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय जानेवारीपर्यंत होण्याचे सूतोवाच केले आहे.
Raigad News : राज्यात महायुतीचे सरकार येवून वर्ष होवूनही अद्याप रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटलेला नाही. आदिती तटकरे यांना दिलेले पालकमंत्री पद रद्द केल्यानंतर अद्याप याचा निकाल लागलेला नाही. पालकमंत्रीपदाचे कोडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गोगावले या दोघांच्या डावपेचांमुळे अधिकच गुंतागुंतीचे बनत आहे. अशातच नव्या वर्षात तरी पालकमंत्रीपद आपल्याला मिळावे यासाठी सरकारदरबारी शिंदे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. यामुळे आता पालकमंत्रीपदाचे अडलेलं घोडं लवकरच मोकळ होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर तसे सुतोवाच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा रायगड पालकमंत्री पदाचा तिढा जानेवारी पर्यंत सुटणार असे म्हटलं आहे.
महायुती सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद शिगेला पोहचला होता. आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देऊ नये अशी आग्रही मागणी रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करून आंदोलन केले होते. तसेच ते महाडचे आमदार भरत गोगावले यांना पालकमंत्री पद द्यावे, अशी आग्रही मागणी केली होती. ज्यामुळे हे पद आजही रिक्त असून मागिल दोन वेळा ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना देण्यात आला आहे.
पण नुकताच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत कोकणात शिवसेनेनं घेतलेल्या मुसंडीनंतर रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगवलेंना मिळावे यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच आता रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला मिळाव, असा आग्रह पुन्हा उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. ते महाडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी, 'माझं स्पष्ट मत आहे की, रायगडचे पालकमंत्री शिवसेनेला मिळावं. मात्र निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतात आणि त्यांनी तो घ्यावा. हा प्रश्न ते लवकरच मार्गी लावतील, येत्या नवीन वर्षात हा प्रश्न सुटेल,' असा विश्वास शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. याआधी देखील उदय सामंत यांनी अशाच पद्धतीने रायगडचे पालकमंत्री शिवसेनेला मिळावं. तर ते गोगावलेंनाच मिळावे अशी मागणी केली होती.
तसेच त्यांनी नुकताच लागेलल्या निकालानंतर रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना, आता शिवसेनेची ताकद काय आहे. ते महाराष्ट्राच्या समोर आले आहे. तसेच गोगावले हे गरीबांचे नेते असून त्यांचे नॅपकीनही कमाल करत असे म्हणत त्यांनी तटकरेंना डिवचलं होतं.
दरम्यान नुकताच एका कार्यक्रमासाठी मंत्री गोगावले आणि आदिती तटकरे व्यासपीठावर एकत्र आल्या होत्या. यावेळी बोलण्याच्या भरात तटकरे यांनी शिवसेनेसह मंत्री गोगावलेंचं नाव घेणं टाळलं होतं. यावरून गोगावले यांनी आदिती तटकरेंना भर मंचावरच सुनावत नाव घ्या असे म्हटले होते. यामुळे विकास कामांसाठी एकत्र येणाऱ्या दोन्ही नेत्यांना मात्र एकमेकांचे वावडे असल्याचे समोर आले होते. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यानंतर याची जोरदार चर्चा राज्यभर झाली होती.
1. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद का निर्माण झाला?
आदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद रद्द केल्यानंतर नव्या नियुक्तीवर एकमत न झाल्याने हा वाद निर्माण झाला.
2. या वादात कोणते प्रमुख नेते सहभागी आहेत?
अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यात मुख्य राजकीय संघर्ष आहे.
3. 26 जानेवारीचा या वादाशी काय संबंध आहे?
प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मान पालकमंत्र्यालाच मिळत असल्याने नियुक्तीसाठी हालचाली वाढल्या आहेत.
4. उदय सामंत यांनी काय संकेत दिले आहेत?
रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा जानेवारीपर्यंत सुटेल, असे सूतोवाच त्यांनी केले आहे.
5. हा वाद महायुती सरकारसाठी किती महत्त्वाचा आहे?
हा वाद महायुतीतील अंतर्गत समन्वय आणि सत्तासंतुलनासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.