Amit Deshmukh_Prakash Ambedkar 
मराठवाडा

Marathwada Mahapalika: विरोधकांनी एकीनं मारलं परभणी, लातूरचं मैदान! बिघाडीनं संभाजीनगर, जालना अन् नांदेडमध्ये सुपडासाफ

Marathwada Mahapalika: मराठवाड्यातील पाच पैकी परभणी आणि लातूर महापालिकेत विरोधी पक्षांनी भाजपचा विजय रथ रोखला.

Jagdish Pansare

Marathwada News: मराठवाड्यातील पाचपैकी परभणी आणि लातूर महापालिकेत विरोधी पक्षांनी भाजपचा विजयरथ रोखला. परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेसने आघाडी केली. पालकमंत्री आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता ज्यांनी गेली दहा वर्ष महापालिकेवर राखली होती ते माजी मंत्री सुरेश वरपूडकर एकत्र असताना भाजपला अपेक्षित यश परभणीत मिळवता आले नाही. तर लातूरमध्ये आमदार अमित देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीलासोबत घेत भाजपला रोखले.

जिथे आघाडी केली तिथे काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला यश मिळाले. पण जिथे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तिथे पानीपत झाले. स्वबळावर लढण्याचा सर्वाधिक फटका या दोन पक्षांना मराठवाड्यात बसला. लातूरमध्ये काँग्रेस-वंचित आघाडीने तर परभणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीने बहुमतासह सत्ता मिळवत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दणका दिला.

परिणामी भाजपचे कमळ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या तीन जिल्ह्यातच उमलले. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला होता. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता महायुतीला कुठेही खाते उघडता आले नव्हते. काँग्रेसने लातूर, नांदेड, जालना मतदारसंघात तर शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाने परभणी, धाराशिवमध्ये बाजी मारली होती. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही भाजपच्या विरोधात धक्कादायक विजय मिळवला होता. एकमेव छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले होते.

लोकसभेचा ट्रेंड विधानसभा निवडणुकीत कोलमडला असला तरी नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग व्हायला हवा होता. पण या निवडणुकीत सगळ्याच पक्षांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे पु्न्हा एकदा भाजपने सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही चांगली कामगिरी स्थानिक निवडणुकीत केली होती. परंतू महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी न करता लढण्याचा तीनही घटक पक्षांचा निर्णय छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि नांदेडमध्ये घातक ठरला.

महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रित लढली असती तर समाधानकारक संख्या त्यांना गाठता आली असती. जो निर्णय लातूरमध्ये अमित देशमुख यांनी आणि परभणीत खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील आणि स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला, तसा इतर जिल्ह्यातील नेत्यांना घेता आला नाही. स्वबळावर लढण्याची ताकद नसताना 80-90 च्यावर उमेदवार देऊन एक आकडी नगरसेवक निवडून आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी स्वतःचे हसे करून घेतले.

अपयशातून धडा घेणार का?

महापालिकेत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन स्वतःचे हात पोळून घेणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि त्यांचे नेते या अपयशातून पुढे तरी काही धडा घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मराठवाड्यातील लातूर, परभणी, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मिनी मंत्रालयाच्या या निवडणुकीत तरी महाविकास आघाडी एकत्र येणार का? हे काही दिवसातच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT