Guardian Minister Pankaja Munde speaks to the media in Jalna during Republic Day visit Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : बाहेरचे येऊन क्राईम करत नाहीत, गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार! पंकजा मुंडेचं 'पालक' असलेल्या शहाराबाबत हास्यास्पद उत्तर

Jalna Crime News : जालन्यात वाढत्या गुन्हेगारीवर पालकमंत्री पंकजा मुंडेंनी दिलेल्या “गुन्हेगारच जबाबदार” या वक्तव्यामुळे पोलिसांची भूमिका आणि कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

उमेश वाघमारे

Jalna News : जालना जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली, दिवसाढवळ्या खून, खंडणीचे प्रकार घडू लागल्याने सर्वसामान्य लोक दहशतीखाली आहेत. अशावेळी पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी ठोस उत्तर देणे अपेक्षित असताना त्यांनी हास्यास्पद वक्तव्य केले. जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार आहेत. इथे बाहेरचे लोक येऊन गुन्हे करतात का? तुमचे इथलेच लोक आहेत ना? असे चमत्कारिक उत्तर पालकमंत्र्यांनी दिल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली जात आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून जालन्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अर्थातच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून याला आळा घालण्याची आणि लोकांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबादीर ही सरकार आणि पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांची आहे. याच भावनेतून पकंजा मुंडे यांना माध्यमांनी जेव्हा जालन्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल प्रश्न विचारला तर तो त्यांना आवडला नाही. कारण यावर त्यांनी दिलेले उत्तर आणि पत्रकारांनाच केलेला उपदेश अनेकांना खटकला.

जालन्यात बाहेरचे लोक येऊन क्राईम करत नाहीत. जालन्यातीलच लोक गुन्हे करतात. त्यामुळे जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार आहेत, असे उत्तर पंकजा मुंडे यांनी माध्यमांना दिले. यावर गुन्हेगारांना रोखण्याची जबाबादीर असलेले पोलीस काय करतात? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. पंकजा मुंडे यांनी वाढत्या गुन्हेगारी सारख्या गंभीर विषयावर असे हास्यास्पद विधान केल्यामुळे जालनाकरांमध्ये संताप पसरला आहे.

जालना शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. महिनाभरामध्ये शहरात दोन खून झाले आहेत. या दोन्ही खुनामध्ये गावठी कट्ट्याचा वापर करण्यात आला आहे. शिवाय चार दिवसांपूर्वी भर दिवसा एका आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण झाले होते. त्याला बेदम मारहाण करत 20 हजाराची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांना आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही.

शहरासह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीचे अनुषंगाने पालकमंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारले असता पालकमंत्र्यांनी चक्क वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगाराचा जबाबदार आहेत असे असं वक्तव्य केले जर गुन्हेगारीला गुन्हेगाराच जबाबदार असतील तर पोलिस प्रशासन नेमकं कशासाठी आहे? हा प्रश्न पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे अनेकांना पडला आहे.

बदनामी करू नका..

पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांना माध्यमांनी वाढत्या गुन्हेगारीवर विचारलेला प्रश्न आवडला नाही. यावर त्यांनी माध्यमांनाच उपदेशाचे डोस पाजले. पत्रकरांनी आपल्याच शहराची बदनामी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. बीडमध्येही मी हे सांगितले, तिथे लोकांनी ऐकले. प्रश्न विचारा, पण काही तरी सनसनीखेज निर्माण करण्यासाठी विचारू नका. यातून आपल्याच शहराची आपण बदनामी करतो याचे भान राहत नाही, अशा शब्दात त्यांनी माध्यमांवर राग काढल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT