Chhatrapati Sambhaji Nagar News : जमिनीवर प्रत्यक्षात नसलेली आंब्याची 80 झाडे कागदोपत्री दाखवून भूसंपादनात झाडांच्या नुकसानभरपाईपोटी तब्बल 19 लाख 27 हजार रुपयांची वाढीव भरपाई लाटणाऱ्यांना झाडांसाठी दिलेली वाढीव नुकसानभरपाई व्याजासह परत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. न्या. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी हा आदेश दिला.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील टाकळी पोखरी येथे पाझर तलावासाठी रावसाहेब चव्हाण आणि अप्पासाहेब चव्हाण यांच्या मालकीची गट क्र. 214 मधील जमीन शासनाकडून संपादित करण्यात आली होती. 2008 मध्ये भूसंपादन अधिकाऱ्यांनी याचा निवाडा दिला. मात्र, मिळालेला मोबदला कमी असल्याचा दावा करत या शेतकऱ्यांनी भूसंपादन न्यायालयात धाव घेतली.
सुरुवातीला दाखल केलेल्या दाव्यात शेतकऱ्यांकडून कोणत्याही झाडांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. मात्र, नंतर न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करताना अचानक '80 आंब्यांच्या झाडांचा' दावा घुसडण्यात आला. बनावट कागदपत्रांच्या आधारे 2016 मध्ये जालना येथील भूसंपादन न्यायालयाने या नसलेल्या झाडांसाठी तब्बल 19 लाख 27 हजार रुपयांची वाढीव भरपाई मंजूर केली होती.
कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले. या सुनावणीत शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. ज्ञानेश्वर कोरडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मे 2005 मधील महसुली नोंदीत 'आंब्याची छोटी झाडे' असा उल्लेख आहे; मात्र, अवघ्या पाच महिन्यांनंतर म्हणजेच डिसेंबर 2005 च्या मूल्यांकन अहवालात तीच झाडे चक्क 30 वर्षे वयाची, 14 फूट उंच आणि फळ देणारी असल्याचे दाखवण्यात आले.
याव्यतिरिक्त, सातबारा उताऱ्यावरील संशयास्पद नोंदी, नोंदीसाठी वेगळ्या शाईचा केलेला वापर आणि मूळ भूसंपादन निवाड्यात झाडांचा नसलेला उल्लेख या बाबी पुराव्यांसह न्यायालयासमोर मांडल्या.
न्या. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी खोटे रेकॉर्ड तयार करून आणि न्यायालयाची दिशाभूल करून ही भरपाई मिळवण्यात आल्याचे स्पष्ट करत, खालच्या न्यायालयाने आंब्याच्या झाडांपोटी दिलेली भरपाई बेकायदा ठरवत रद्द केली.
तसेच शासनाकडून मिळालेली भरपाईची रक्कम 8 आठवड्यांच्या आत बँकेच्या चालू व्याजदराने परत करण्याचे आदेश दिले आहेत. मुदतीत रक्कम न भरल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी हमीपत्राच्या आधारे तात्काळ वसुलीची कारवाई करावी, असेही आदेशात बजावण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.