Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Jalna Loksabha Constituency : '...तर जाहीर सभेत उठाबशा मारेन' ; दानवेंचे विरोधकांना चॅलेंज!

Tushar Patil

Loksabha Election : 'लोकांनी मला जालना लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून पाठवलं. जिल्ह्यातील पायाभूत सोयी-सुविधांसाठी खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री म्हणून कोट्यवधीचा निधी आणला. यातून रस्ते, पाणी, वीज, रेल्वे कामांचा विकास झाला. पण विरोधक विकासकामांवर बोलायलाच तयार नाहीत. माझे त्यांना खुले आव्हान आहे, त्यांनी माझ्याशी विकास कामावर समोर येऊन चर्चा करावी.' असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

तसेच 'खासदार म्हणून मतदारसंघातील जनतेसाठी काय केले हे सांगू शकलो नाही, तर जाहीर सभेत उठाबशा काढीन.', असं चॅलेंजही रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी विरोधकांना दिले. मतदारसंघातील गोलापांगरी येथील प्रचार सभेत रावसाहेब दानवे यांनी आपल्या खासदारकीच्या काळात झालेल्या विकास कामांची जंत्री मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी रावासाहेब दानवे म्हणाले, 'जालना जिल्ह्यात रस्ते, वीज, पाणीपुरवठा, सिंचन अशा पायाभूत सुविधांसाठी आपण केंद्राकडून हजारो कोटींचा निधी खेचून आणला. यातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. आयसीटी सारखे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय, ड्रायपोर्ट सारख्या महत्त्वाकांशी प्रकल्पांमुळे जालन्याचे नाव देश आणि जगाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.'

'पण नेता आणि निती नसलेले विरोधक विकासावर निवडणूक लढवण्यास तयार नाहीत, केवळ माझ्यावर टीका करूनच जनतेची दिशाभूल करत आहेत .त्यांनी टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलावं आपण कमी पडलो तर जाहीर सभेत उठाबशा मारण्याची आपली तयारी आहे.', असे जाहीर आव्हान दानवे यांनी महाविकास आघाडीला दिले.

'काँग्रेसच्या राजवटीत आघाडी सरकारमुळे देशात पसरलेल्या अस्थिरतेच्या उदाहरणासह दानवे यांनी विरोधकांवर टीका केली. भाजप(BJP) महायुतीकडे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या रूपाने नेतृत्व आहे. या उलट काँग्रेस आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही. त्यासाठी त्यांच्याकडे स्पर्धा आहे, चेहरा नसलेला पक्ष आणि आघाडी मत मागण्यास येत आहेत.', असा टोला दानवे यांनी यावेळी लगावला.

आपण जालना जिल्ह्यात सहा हजार कोटींचे सिमेंट रस्ते, शहर व ग्रामीण भागात विजेची समस्या निकाली काढण्यासाठी प्रत्येक पाच किमी अंतरावर एक 33 के. व्ही.सबस्टेशन होण्याकरिता केंद्राकडून पाचशे कोटींचा निधी आणला. भविष्यात सौर उर्जेवर गावांना प्रकाश मिळण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मतदारसंघाचा आणि देशाचा सर्वांगीण विकास करायचा असले, देशाला महाशक्ती करायचे असेल, तर नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करा, असे आवाहन दानवे यांनी उपस्थितांना केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT