Loksabha Election : गेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा खेळ बिघडवला होता. अगदी तशीच परिस्थिती यावेळी जालना लोकसभा मतदारसंघा निर्माण होऊ पाहत आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान आपली कार भर रस्त्यात जाळणारे आणि आरक्षणाला विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुंबईत जाऊन अलिशान गाडी फोडणारे मंगेश साबळे एका रात्रीत राज्यभरात चर्चेत आले. त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढली. मंगळे साबळे यांच्यामुळे भाजपचे रावसाहेब दानवे Raosaheb Danve की काँग्रेसचे कल्याण काळे या दोघांपैकी कोणाला फटका बसणार याची चर्चा सुरू आहे.
फुलंब्री तालुक्यातील एका गावचे सरपंच असलेले साबळे Mangesh Sable आपल्या आंदोलनाच्या हटके स्टाईलमुळे विशेषतः तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणाच्या लढ्याला सुरुवात झाली तेव्हापासून मंगेश साबळे चर्चेत आहेत. राज्यातील महायुती सरकारने मराठा आरक्षणाच्या नावावर समाजाची फसवणूक केली असा आरोप केला जातोय. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील Manoj Jarange patil यांनी या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत ज्याला पाडायचे त्याला पाडा, असा सूचक संदेश मराठा समाजाला दिला होता.
याचे पडसाद मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात उमटल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या जालना मतदारसंघात मंगेश साबळे यांनी अपक्ष निवडणूक लढवत चुरस निर्माण केली होती. साबळे यांच्या पदयात्रा, काॅर्नर बैठका, छोटेखानी सभा यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. विशेषतः फुलंब्री, पैठण आणि सिल्लोडच्या काही भागात त्यांना तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्याचे चित्र होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरच गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 83 हजार इतकी विक्रमी मते मिळवली होती. जालना लोकसभा मतदारसंघात मंगेश साबळे एवढी मजल मारू शकले नाही, तरी ते प्रमुख उमेदवारांचा खेळ बिघडवण्या इतकी मते मिळवतील, असे बोलले जाते. 13 मे रोजी या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे, महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांच्यासह अपक्ष व इतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आता जेव्हा चार जूनला ईव्हीएम मशीन उघडले जातील, तेव्हाच मंगेश साबळे कोणाचा गेम करतात? हे स्पष्ट होईल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एका छोट्याशा गावचे सरपंच म्हणून मंगेश साबळे यांची ओळख होती. मात्र सरपंच ते लोकसभा निवडणूक लढविण्याचा थेट निर्णय घेतल्याने लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने साबळेंना डोक्यावर घेतले. वर्षभरापूर्वी पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सर्वसामान्यांची कामे होत नाही, अधिकारी पैसे मागतात म्हणून दोन लाख रुपयांची उधळण करत साबळे यांनी स्टंटबाजी केली होती. पण यामुळे त्यांना राज्यभरात प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात स्वतःची नवी कोरी गाडी जाळून साबळे यांनी पुन्हा माध्यमांचे लक्ष आपल्याकडे केंद्रीत करून घेतले होते.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.