Jalna Maratha Protest Sarkarnama
मराठवाडा

Jalna Maratha Protest : जालन्यात शेकडो आंदोलक आणि पोलिसांत पुन्हा धुमश्चक्री; नेमकं काय झालं ?

Maharashtra State On Maratha Reservation : सरकारने शांततेचे आवाहन करूनही आंदोलक रस्त्यावर

Sunil Balasaheb Dhumal

Jalna News : मराठा आरक्षणासाठी शांततेत सुरू असणाऱ्या आंदोलनावर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर आंदोलन चिघळू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी शांततेचे आवाहन केले होते. यानंतरही शनिवारी जालन्यातील अंबड चौफुली, इंदेवाडीत मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली. यामुळे पोलीस आणि शेकडो आंदोलकामध्ये धुमश्चक्री सुरू झाली आहे. यात आंदोलकांनी दगडफेक केली तर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे आंदोलन आणखी चिघळते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. (Latest Maratha Protest News )

जालन्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर अचानकच शुक्रवारी सांयकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला. यात ३५० हून अधिक आंदोलक तर सुमारे ३५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा प्रकार सरकारमुळे घडल्याचा आरोप विरोधकांनी करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आंदोलनानंतर राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. अनेक ठिकणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. आंदोलनस्थळाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार उदयनराजे, छत्रपती संभाजीराजेंनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. या नेत्यांसह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवारांनी आंदोलकांना आरक्षणाबाबत आश्वस्त करत शांततेचे आवाहन केले होते.

यानंतरही शनिवारी सायंकाळी जालन्यातील अंबड चौफुली, इंदेवाडी परिसरात आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले होते. यावेळी जाळपोळीच्याही घटना घडल्या. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यातून आंदोलक आणि पोलीस सलग दुसऱ्या दिवशी आमनेसामने आल्याचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, "समाजात आस्था असलेले आंदोलन कधीही हाताबाहेर जाऊ देऊ नये. आंदोलन शांततेत सुरू ठेवावे. सरकारशी योग्य बोलणी होऊन समाधान झाले तर आंदोलन थांबवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत विचार करावा. कायदा हातात घेतल्याने आंदोलन, आंदोलक आणि प्रश्नाची बदनामी होते. त्यामुळे शांततेत आंदोलन सुरू ठेवावे", असा सल्ला देत शरद पवारांनी या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा", असे असे आवाहनही केलेले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT