Jalna Political News : 'मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत आस्था आहे. आस्था असलेले आंदोलन हाताबाहेर जाऊ देऊ नये. कायदा हातात घेऊन आपला प्रश्न, आंदोलन, आंदोलकांची बदनामी होईल असे कृत्य करू नये', असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी जालन्यातील मराठा आंदोलकांना दिला आहे. तर 'चर्चा सुरळीत होत असताना कुठूनतरी आदेश आले आणि पोलिसांनी दृष्टीकोन बदलत थेट लाठीमार सुरू केला', असा आरोप करत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणाही साधला. (Latest Political News)
जालन्यातील आंतरवली सराटी गावात शांततेत सुरू असलेले मराठा आंदोलन (Maratha Reservation Protest) शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यामुळे चिघळले. पोलिसांच्या कृतीमुळे राज्यात जाळपोळ, रास्तारोको अशा घटना घडल्या. शहर-गावबंदीसारखे निर्णय घेण्यात आले. 'आश्चर्य वाटेल अशा प्रकारे पोलीस बळाचा वापर केला. यात मुले, महिला असे न पाहता पोलिसांनी सरसरकट सर्वांना झोडपून काढले', असा आरोप करत आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटू नयेत यासाठीच आंदोलकांच्या म्हणण्यानुसार आलो असल्याचे पवारांनी सांगितले.
पवार म्हणाले, "चर्चा केल्यानंतर समजले की, पोलीस आणि आंदोलकांशी चर्चा सुरळीत सुरू होती. यातून काहीतरी मार्ग निघेल वाटत होते. मात्र कुठूनतरी सूचना आल्या आणि पोलिसांनी त्यांच्या दृष्टीकोन बदलला. यानंतर थेट लाठीहल्ला सुरू केला. यामुळे गावातील लोकही जमा झाले. ही वाढलेली संख्या पाहून पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे वाटते. पोलिसांनी छर्रेचा वापर केल्याने अनेक लोक जखमी झालेत. यातून सरकार निष्पाप नागरिकांना कोणत्या पद्धतीने वागवणूक दिली, हे दिसून आले."
उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भूमिका समंजस्याची असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. "काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या सरकारने आरक्षणासंबंधी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने ते न्यायालयात टिकला नाही. आमचे सरकार गेल्यानंतर आलेल्या भाजपने सरकारने काय निर्णय घेतला हे माहिती नाही. यातून मार्ग काढण्याचीच मागणी असून तो निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची जरांगेंची भूमिका आहे", असे सांगत शरद पवारांनी (Sharad Pawar) आंदोलकांना काही सूचनाही दिल्या आहेत.
"या समाजात आस्था आहे. आस्था असलेले आंदोलन कधीही हाताबाहेर जाऊ देऊ नये. त्यामुळे हे आंदोलन शांततेत चालू ठेवा. सरकारशी योग्य बोलणी होऊन समाधान झाले तर आंदोलन थांबवण्याबाबत निर्णयही घेण्याबाबत विचार करावा. आता काही ठिकणी जाळपोळ होत आहे. यामुळे आंदोलन चिघळून आंदोलन, आंदोलक आणि प्रश्नाची बदनामी होते. हे टाळण्यासाठी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा", असे आवाहनही पवारांनी आंदोलकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.