Beed News : मराठा समाजाला सरकसट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दुसरीकडे या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन केले जात असून काही गावात अजूनही नेत्यांना गावबंदी आहे. आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण करीत सरकारचे लक्ष वेधले आहे.
मराठा समाजाला सरकसट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मुंबईला उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील दोन दिवस गोदाकाठच्या गावांना भेटी देणार आहेत. रविवार (ता. सात) पासून त्यांचा बीड जिल्हा दौरा आहे.
मराठा समाजाला (Martha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे उपोषण केले. या उपोषणाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक नित्याने सहभागी होत. यात गोदाकाठच्या गावांतील नागरिकांची अधिक संख्या असे. दोन्ही उपोषणांना जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळालेला आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी मधल्या काळात जिल्ह्यात घेतलेल्या संवाद सभांनाही प्रतिसाद भेटला. तर, गेल्या महिन्यात त्यांनी बीडला अंतिम इशारा महासभा घेऊनच २० जानेवारीला मुंबईकडे उपोषणासाठी जाण्याची घोषणा केली आहे. या सभेलाही प्रतिसाद मिळाला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईच्या उपोषणाला जाण्यासाठी पायी वारी निघणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना भेटी देणार आहेत. रविवारी (ता. सात) जरांगे पाटील गेवराई तालुक्यातील खामगाव, सावळेश्वर, गंगावाडी, म्हाळसा पिंपळगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, सुरळेगाव, गुळज, मालेगाव, जळगाव फाटा व उमापूरला भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तर, सोमवारी (ता. आठ) धुमेगाव, अर्धपिंप्री, चकलांबा, शेकटा, बंगाली पिंपळापा, खळेगाव, माटेगाव, राजपिंप्री, गव्हारे पिंप्री, पांढरवाडी, धोंडराई आदी गावांना भेटी देणार आहेत.