MLA Jitendra Awhad News Sarkarnama
मराठवाडा

MLA Jitendra Awhad News : आव्हाडांनी शिंदे गटाला लावले कामाला; युतीतच लढणार सांगतांना होतेय दमछाक..

Jagdish Pansare

Maharashtra Political News : जितेंद्र आव्हाड यांनी वाद पेटवली आणि शिंदे गटाची दमछाक झाली, असे चित्र आज दिवसभर दिसत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचे सूप काल (20 डिसेंबर) वाजले. नागपूर हे अधिवेशन काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडवण्यासाठी ओळखले जाते. या हिवाळी अधिवेशनात अशा मोठ्या घडामोडी घडल्या नसल्या तरी महायुतीतील आमदारांचे (MLA Jitendra Awhad News) रेशीमबागच्या संघ कार्यालयात झालेले बौद्धिक शिबीर, दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी संघ कार्यालयाला दिलेली भेट यावरून विरोधकांनी शिंदेसेनेला घेरले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संघ कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजपने येणारी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी, असा संदेश दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. (Shivsena) महायुतीत असलेल्या पक्षांना सोबत राहायचे असेल तर त्यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अटही टाकण्यात आली असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

यावरून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात गदारोळ सुरू झाला आहे. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला आव्हाड यांच्या या दाव्याने कामाला लावले आहे. (Sanjay Shirsat) आम्ही युतीतच लढणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी या संदर्भात बोलणे झाले आहे, असे स्पष्टीकरण देताना शिंदेसेनेच्या प्रवक्त्यांची दमछाक होताना दिसते आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर अधिवेशनातून छत्रपती संभाजीनगरात परतलेल्या शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी आव्हाडांच्या दाव्यावर भाष्य करताना काही गोष्टींचा खुलासा केला आहे. 'येणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत, त्याही धनुष्यबाण चिन्हावरच. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या रिकामटेकड्या लोकांकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही.'

लोकभा निवडणूक युती म्हणून एकत्र लढायची, शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावरच लढतील या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात स्पष्ट संवाद झालेला आहे. त्यामुळे नागपूरच्या संघ कार्यालयात बैठक झाली आणि त्यात अमूक ठरले हे आव्हाड यांचे दावे दिशाभूल करणारे आहेत.

या उचापती करण्यापेक्षा आपला पक्ष फुटला आहे, त्याकडे आव्हाडांनी लक्ष द्यावे, असा टोला शिरसाट यांनी लगावला. 10 जानेवारी रोजी आमदार अपात्रते संदर्भातील निकालही आमच्या बाजूनेच लागणार, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला. पक्ष आणि चिन्हा याबाबतीत यापूर्वीच आम्हाला मान्यता मिळालेली आहे, त्यामुळे हा निकालही आमच्या बाजूनेच लागणार, असा दावा शिरसाट यांनी केला.

(Edited By : Jagdish Pansare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT