Kailas gorntyal, Arjun Khotkar  Sarkarnama
मराठवाडा

Jalna News : जालन्यातील मेडिकल कॉलेजवरून गोरंट्याल, खोतकरांमध्ये खडाजंगी

Sachin Waghmare

Jalna Political News : विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुतीच्या जागा वाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. एकीकडे जागा वाटपाच्या बैठका सुरू असतानाच दुसरीकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांकडून भेटीगाठींवर भर दिला जात आहे.

त्यातच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या मंडळींकडून जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. जालन्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर पुन्हा आमने-सामने आले आहेत.

या दोन नेत्यांमध्ये जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेयवादावरून आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मेडिकल कॉलेजची निर्मिती आपल्यामुळेच झाली असल्याचा दावा केला आहे.

जालन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न केल्याचा दावा कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी पत्रकार परिषदेत केला. अमित देशमुख हे वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी कुंभेफळ येथील जागा निश्चित केली होती.

सातबारा उताऱ्यावर मेडिकल काॅलेजचे नाव आले. त्यानंतर राजेश टोपे यांनी विभागीय मनोरुग्णालयासाठी ही जागा घेतली. सत्तांतर झाले गिरीश महाजन या खात्याचे मंत्री असताना आपण विधानसभेच्या पायर्‍यांवर उपोषण केले, निदर्शने केली या सगळ्या आंदोलनात आमदार राजेश टोपे, आमदार राजेश राठोड हे माझ्यासोबत होते.

काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी पाठींबा दिला. यावेळी माझे उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगित करण्याची विनंती केली आणि गिरीश महाजन यांना अधिवेशनात जालन्यात मेडिकल काॅलेज मंजुरीची घोषणा करण्याची सुचना केली. पुन्हा सत्तांतर झाले हसन मुश्रीफ हे या खात्याचे मंत्री झाले.

त्यानंतर सेंट मेरी हायस्कूल शेजारच्या जागेवर गायरान जमीन देण्यात आली. या जागेवर नगर परिषदेचे रिझर्व्हेशन असल्यामुळे ते लांबले होते. त्यानंतर काजळा रोडवर जागा मंजूर झाली. आता सध्या खासगी जागेत महाविद्यालय सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कामात जालन्यातील जनतेनी पूर्ण साथ दिली याचे श्रेय घेण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते अनेक वर्षे मंत्री होते. त्यांना त्यांच्या घरासमोरचा रस्ता, नाला करता आलेला नाही, या शब्दात गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर टिका केली.

दुसरीकडे जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही केलेल्या प्रयत्नातून झाले असल्याचा दावा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेत केला. विरोधी पक्षाच्या प्रतिनिधीला विधानसभेत बोलण्यासाठी तर पाठवले आहे आम्हाला बोलण्याची गरज नाही, हे महाविद्यालय आम्ही आणले आहे. स्थानिक आमदारांचा यात काही सहभाग नसल्याचे खोतकर म्हणाले.

वैद्यकीय महाविद्यालयात राजकारण कुणी करू नये, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दिल्लीत जाऊन भेटले आणि त्यानंतर सर्व अडचणी दूर झाल्या आहेत, असे भास्कर दानवे यांनी सांगितले. खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी एकतरी नवीन विकास काम जालन्यात आणून वेळेत पूर्ण करून दाखवावे, असे आव्हान दानवे यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT