Kailas Patil Sarkarnama
मराठवाडा

Kailas Patil News : ...अन् ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांना आली भोवळ, रुग्णालयात दाखल!

सरकारनामा ब्यूरो

Dharashiv Lok Sabha Constituency : सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे उन्हाचा कडाका प्रचंड वाढलेला असताना, प्रचार सभांमुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापलेलं आहे.

निवडुणकीसाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिल्याने, प्रत्येक तास आणि प्रत्येक दिवस हा राजकीय पक्षांसाठी आणि त्यांच्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळेच सकाळपासून ते रात्रीपर्यंत उन्हाची तमा न बाळगता भर दुपारीही प्रचार कार्य सुरू आहे. यासाठी सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते झटून कामाला लागले आहेत.

मात्र वाढलेल्या तापमानाचा फटकाही राजकीय नेत्यांना बसताना दिसत आहे. याचे उदाहरण धाराशीव येथे समोर आले. या ठिकाणी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा फटका बसला. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांना भोवळ आली आणि ते कोसळले. परिणामी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिवमधील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये आमदर कैलास पाटील हे पूर्णवेळ सहभागी झाले होते. ते एक वाहनातून लोकांना अभिवादन करत होते. दरम्यान ट्रकवरुन उतरून सभामंचाकडे जात असताना, त्यांना अचानक भोवळ आली आणि ते कोसळले.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उन्हाच्या वाढत्या कडाक्याच्या पार्श्वभूमीवर ट्वीट केलं आहे. राज ठाकरे म्हणाले, 'गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल. ' असं म्हणत त्यांनी मनसे कार्यकर्त्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT