Aimim-Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एमआयएमचे माजी खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यातील वाढत्या जवळीकतेने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी 'उबाठा' एमआयएम सोबत जाणार असा दावा माध्यमांशी बोलताना केला. यावरून आता दोन्ही शिवसेनेमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे.
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिरसाट यांच्यावर पलटवार करत 'आम्ही आमचं बघू, तुम्हासा भाजप- राष्ट्रवादी सोबत घेणार का? हे बघा' असा टोला लगावला आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बेकायदेशीर मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी इम्तियाज जलील यांनी जाहीर आरोप करत खळबळ उडून दिली.
या आरोपानंतर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी इम्तियाज जलील यांचा बोलवता धनी दुसराच कोणी असल्याचे सांगत अंबादास दानवे यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या बोट दाखवले. इम्तियाज जलील यांनी अंबादास दानवे यांना त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन संजय शिरसाट यांच्या बेकायदा मालमत्ता खरेदीचे पुरावे आणि कागदपत्रे दिली होती. याचा संबंध जोडत शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एमआयएम एकत्र येऊ शकतात, असा दावा केला.
यावर अंबादास दानवे यांनी 'मी विरोधी पक्षनेता असल्यामुळे इम्तियाज जलील यांनी माझ्याकडे शिरसाट यांच्या विरोधातील पुरावे आणून दिले. आम्ही एमआयएम बरोबर जाणार हे सांगण्यापेक्षा तुम्हाला भाजप आणि शिवसेना सोबत घेणार नाही त्याकडे लक्ष द्या', अशा शब्दात सुनावले. तर चंद्रकांत खैरे यांनी आम्ही एमआयएम बरोबर जाणार नाही. महापालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा शिरसाट यांनी आपल्या पक्षात काय चालले आहे? त्याकडे अधिक लक्ष द्यावे, असा चिमटा काढला.
एकूणच एमआयएम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या एकत्र येण्याची चर्चा स्थानिक नेत्यांना तूर्तास तरी नको आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीला रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निश्चितच वेगळी आणि धक्कादायक खेळी केली जाणार आहे. मात्र त्याबद्दल आत्ताच चर्चा किंवा वाच्यता नको, याची काळजी स्थानिक नेते घेताना दिसत आहेत. त्यामुळेच संजय शिरसाट यांनी एमआयएम बरोबर जाण्याचा आरोप करताच खैरे- दानवे यांनी पुढे येत त्यांचा दावा खोडून काढण्याचे काम केले.
महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर स्थानिक पातळीवर युती- आघाड्यांची चर्चा वेग धरणार आहे. पक्षफुटी नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाल नव्या मित्राची गरज भासणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची शहरात फारशी ताकद नसल्याने पक्ष वेगळा विचार करू शकतो. तो एमआयएम सोबत जाण्याचा असू शकतो, अशी चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.