Sushma Andhare and Krishna Patil Ashtikar sarkarnama
मराठवाडा

Krishna Patil Ashtikar : 'बापाला जोडे मारायला सांगणार्‍यांची मानसिकता कळते, त्यांच्या जिभेला...!'; अंधारे-आष्टीकरांमध्ये जुंपली...

Krishna Patil Ashtikar Vs Sushma Andhare : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जोरदार राजकीय घडामोडी घडल्या असून येथे आष्टीकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

Jagdish Pansare

Nanded Shivsena News : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत दिल्लीत भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर त्यांच्याविरोधात मतदारसंघात संताप उसळला. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचे मतदान चोवीस तासांवर असताना या सगळ्या घडामोडी घडल्या. याचा फटका नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपूत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांना बसणार होता. या पार्श्वभूमीवर कृष्णा पाटील आष्टीकर यांनी लगोलग मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. महाविकास आघाडीचा मीच उमेदवार आहे, असे स्पष्टीकरण दिले होते.

त्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कृष्णा पाटील आष्टीकर यांना तुम्ही उद्धव ठाकरे बरोबर आहात हे मानलं, मग वडिलांनी केलेल्या गद्दारीचा निषेध म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्यानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पलटवार करताना बापाला जोडे मारायला सांगणाऱ्या सुषमा अंधारे यांची मानसिकता कळते. त्यांच्या जिभेला असभ्यपणाचा आजार जडलायं म्हणत टीका केली. त्यानंतर अंधारे विरुद्ध आष्टीकर यांच्यात एकमेकांवर टीकेचा भडीमार सुरू झाला आहे.

उद्धव ठाकरेंसोबतची निष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वत:चाच वडिलांचे पिंडदान करावे. उद्याच त्यांनी पिंडदान करून बापाच्या प्रतिमेला जोडे मारावेत. मग आम्ही म्हणून की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत खरोखरच आहात, असं म्हणत कृष्णा पाटील यांचा उल्लेख अंधारे यांनी 'झिंगूर' असा केला होता. यावर असभ्य, जिभेचा आजार झालेल्या बाईला परत परत उत्तर देणार नाही. त्यांनी मला झिंगूर म्हटले असेल तर त्या सरडा आहेत. बाळासाहेब, उद्धव साहेब, आदित्य साहेब यांच्याबद्दल ही बाई काय काय बोलली होती? ते सर्व बाजूला ठेवून आम्ही या बाईला स्वीकारलं होत.

हिंदू देव-देवतांवर ही बाई काय काय बोलली होती ते सगळं आम्ही बाजूला ठेवलं होतं. आज ही बाई आम्हाला धर्माबद्दल नीतीबद्दल शिकवत आहे. जुनं मलाही काढता येतं, वयाने लहान आहे म्हणून आपला आदर करतोय. गृहीत धरायचं कारण नाही त्या सुशिक्षित असतील तर आम्ही काही अडाणी नाही. बोलता आम्हाला येतं परंतु आम्ही तुमच्यासारखी पातळी घसरू दिली नाही. तुम्ही बोलत जा आणि त्या गोष्टी किती सुसंस्कृत आहेत हे महाराष्ट्र ठरवेल, अशा शब्दात आष्टीकर यांनी सुषमा अंधारे यांना सुनावले.

मला वडीलांच्या प्रतिमेला जोडे मारायला सांगणाऱ्या सुषमा अंधारे बाळासाहेब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या बद्दल तुम्ही किती बोलला होतात, मग या अगोदर यांना किती जोडे मारायला पाहिजे होते? मी माझ्या वडिलांना जोडे मारो आंदोलन करणार नाही. हिंदू धर्मामध्ये वडिलांच्या पाया पडले जाते. त्यांना कुठल्याही स्वरूपात जोडे मारले जात नाहीत. एका मुलाला आपल्या बापाला जोडे मारायला लावते म्हणजे त्या बाईची मानसिकता कळते. आपण बोलताना कुणाबद्दल बोलतोय त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीसोबत काय नात आहे हे तपासून बोलावं. पक्षाची जी वाहतात सुरू आहे यासाठी ही बाई जबाबदार आहे, असा हल्लाबोलही कृष्णा पाटील यांनी केला.

सुषमा अंधारे यांनी वडिलांचं श्राद्ध घालण्याची भाषा केली होती. माणूस मेल्यावर श्राद्ध घातलं जातं. वर्षभरापूर्वीच मी माझी आई गमावली आहे. वर्षही झालं नाही मी माझ्या आईचं श्राद्ध घातल आहे. मी तर म्हणतो या बाईचे सामूहिक श्राद्ध घातलं पाहिजे. या बाईने ज्या दिवशी हिंदू देवी देवतांबद्दल बोलून अपमान केला तेव्हा तिला धडा शिकवायला हवा होता. वैचारिक पातळीवर आपला विरोध असला पाहिजे. ही बाई तर मला शिवसेनेतून हाकलायला बसली आहे, असा एकेरी उल्लेख करत कृष्णा पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT