Kundlik Khande  Sarkarnama
मराठवाडा

Beed News : पंकजा अन् धनंजय मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य, हल्ला प्रकरणात अटक; तुरूंगातून बाहेर येताच माजी जिल्हाप्रमुख म्हणाले...

Datta Deshmukh

नको ते आरोप करुन चांगल्यांना बदनाम करण्याची परंपरा होती आणि आजही कायम आहे. माझ्यासोबतही तेच घडले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण समाजकारण आणि राजकारणात बदल घडवू पाहात आहे. हे प्रस्थापितांच्या नजरेत खुपले म्हणूनच मला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न होतो आहे.

मात्र, मी सर्वसामान्यांच्या पाठबळावर लढा देणारच आणि तुमच्यामुळेच मी आज सक्षमपणे निधड्या छातीने लढण्यास तयार झालो, असा विश्वास शिवसेनेचे ( शिंदे गट ) माजी जिल्हाप्रमुख आणि सरपंच-उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी समर्थकांना दिला.

तुरुंगवास आणि विजनवास हा प्रभू श्रीकृष्णाला आणि प्रभू श्रीरामांना चुकला नाही, असेही खांडे म्हणाले. दोन महिन्याच्या कोठडीनंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन दिला. त्यानंतर तुरुंगवासातून बाहेर आल्यानंतर समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचे जोरदार स्वागत केले.

शिवसेना ( Shivsena ) उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्‍वर खांडे यांच्यावर बीडजवळ एप्रिल महिन्यात प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी 12 जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणाच्या कलमाखाली गुन्हा नोंद झाला होता. संशयितांमध्ये शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचेही नाव होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत ते राजरोस भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारात उघडपणे फिरत होते.

निकालानंतर त्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) व धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्याबद्दल वक्तव्य होते. त्या क्लिपनंतर खांडे यांना अटक झाली. त्यानंतर पक्षाने शिवसेनेने त्यांना जिल्हाप्रमुख पदावरुनही काढले. तब्बल दोन महिने ते कोठडीत होते. बुधवारी न्यायालयाने त्यांना काही अटींसह जामीन मंजूर केला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी कुंडलिक खांडे यांची मुक्तता झाली. खांडे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी गर्दी करुन त्यांचे जंगी स्वागत कले.

कुंडलिक खांडे म्हणाले, "चुकीच्या खटल्यात मला अटक झाली होती. परंतु, जनसामर्थ्य आजही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. लोक चुकीचे आरोप करतात मात्र न्यायालय कायम न्याय देते. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता तो फक्त मी अतिशय लहान कुटुंबातून आलो आहे म्हणणूनच. मी संघर्ष केला आहे, मला कोणाचाही वरदहस्त नव्हता, गोरगरीब, उपेक्षित, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी मी लढलो आणि यापुढेही लढणार आहे ते फक्त तुमच्या पाठबळावर."

"लढणे हा माझा स्वभाव आहे, मी तुमच्यासाठी यापुढेही अहोरात्र कष्ट करेल. तुम्ही फक्त हाक द्या मी माझ्या परीने सर्व शक्तीने साथ देईल," असे भावनिक आवाहन कुंडलिक खांडे यांनी केले.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT