पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पालघरमधील सिडको भवन येत आले होते. यावेळी त्यांनी प्रथम या बंदराचे भूमिपूजन केले. त्यानंतर मार्गदर्शन करताना मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी जनतेची प्रथमच माफी मागितली. पंतप्रधान नरेंद्र मोंदींची माफी नेमकं काय सांगते? याबाबत आपण चर्चा करणार आहोत सकाळचे समन्वयक संपादक संभाजी पाटील यांच्याशी...
-हा संपूर्ण प्रकार राज्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठीच धक्कादायक आहे. धक्कादायक या साठी की संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण चालते. शिवाजी महाराजांचा जयघोष करून नेहमीच आपण पहिले पाऊल टाकत असतो. त्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्रात राजकारण होऊ शकत नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा ही दुर्देवी घटना आहे. या दुर्देवी घटनेनंतरही महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून जे काही राजकारण सुरु आहे. ती संपूर्ण जनता पाहत आहे. या राजकारणाविषयी ही जनतेच्या मनात फार चांगली अशी भावना नाही. ज्या पद्धतीने दोन पक्ष भिडत आहेत. जे काही राजकारण सुरु आहे. त्याच्या विषयी लोकांच्या मनामध्ये चीड आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्रात आले होते. त्यांनी या घटनेबाबत महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली. हा प्रसंगही तसाच होता ज्या छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करणे जेवढे सोपे आहे. त्या ठिकाणी जर एकादी चूक घडली तर त्या चुकीचं जबाबदारी कोण घेणार ? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता. त्या प्रकरणी पीएम मोदींनी आज सर्वांची माफी मागितली. त्याच्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याप्रकरणी कोण राजकारण करू नये, असे म्हणत या संपूर्ण प्रकरणी माफी मागत, हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न दिसून आला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आयते कोलीत मिळाले असे म्हणायला हरकत नाही. त्याच ठिकाणी राजकोटावर कार्यकर्ते भिडतात अन त्यातून वेगवेगळे संदेश दिले जातात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीसाठी याच गोष्टी खूप डोकेदुखीच्या ठरण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आज नरेंद्र मोदींनी मागितलेली माफी कुठं तरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे का ?
-आतापर्यंतचा सर्व सिक्वेन्स जर बघितला तर लोकसभेमध्ये जी काही महाविकास आघाडीची कामगिरी होती. ते पाहता महायुतीसाठी एकंदरीत टेन्शनचे वातावरण आहे. यामधून काही सुधारणा करण्यासाठी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. त्या योजनेचा संपूर्ण राज्यभर धुमधडाक्यात शुभारंभ केला.
प्रत्येक घरातील महिलांना त्यामधून खुश करण्याचा प्रयत्न असताना व लोकसभेनंतरचे डॅमेज कंट्रोल कव्हर करीत असताना, त्याचबरोबर मुंबईत जी लहान मुलीवर अत्याचाराची घटना घडली. त्यामुळे या सरकारची निंदा केली जात आहे. त्यानंतर जो मालवणचा प्रकार घडला. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला व विरोधी पक्षाला आयता मुद्दा मिळाला. कारण प्रत्येकवेळी छत्रपतींचे नाव घेता. त्यामध्ये भ्र्ष्टाचार झाला. हा पुतळा उभारत असताना तरी या गोष्टी टाळायला हव्या होत्या, असे अपेक्षित होते. मात्र ते या ठिकाणी झाले नाही. निश्चितच तुम्ही म्हणतात तसे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सर्व प्रकार चिंता वाढविणारा आहे.
राज्यभर या घटनेचे पडसाद उमटत आहेत. गावोगावी नाराजी व्यक्त केली जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार जे काही लोकप्रियता मिवण्याचा प्रयत्न करीत होते. तो या दोन घटनेमुळे पुसट झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी या माध्यमातून या घटनेवर थोडासा पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हा मुद्दा येणाऱ्या काळात खूप गाजणार आहे.
याबाबत सर्वांनाच काही तरी सांगायचे आहे. त्यामुळे हा जरी निवडणुकीचा मुद्दा बाजूला ठेवला तर जे काही रस्त्याचे कामे सुरु आहेत, सार्वजनिक बांधकाम खात्याची कामे सुरु आहेत. त्यामुळे येत्या काळात या मुद्द्यासॊबतच भ्रष्टाचाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. त्यावर आता काय उत्तर शॊधणार हा महत्वाचा मुद्दा आहे. यावर नरेंद्र मोदी बोलले असले तरी यामधून सरकार काय बोध घेणार ? यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
याचा फायदा किती होणार हे महत्वाचे असले तरी या प्रश्नी विरोधी प्रश्न आक्रमक झाले आहेत ? नरेंद्र मोदी यांनी माफी मागण्यासाठी उशीर केला असल्याची टीका केली जात आहे. मुळात मविआकडून महायुतीच्या विरोधात एक नॅरेटिव्ह सेट केला जात आहे. तशा प्रकारचे राजकारण पहावयास मिळत आहे. त्यातच आपण शरद पवार यांचे राजकारण पाहतोय ते एका एकाला गळाला लावत आहेत. त्यातच या सर्व घटना घडत आहेत. त्यामध्ये या सर्व घटना घडत आहेत. त्यामुळे माफी मागायला उशीर करण्यात आला अशाप्रकारचे चित्र मविआकडून तयार केले जात आहे. त्यामुळे मोदींना माफी मागायला यावे लागले आणि मोदींनी माफी मागितली का ?
- हे सर्व प्रकरण महायुतीला व्यवस्थितरित्या हॅण्डल करता आले नाही. हे आपल्याला मान्य करावेच लागेल. हे प्रकरण घडल्यानंतर नेमके काय करावे हे कॊणालाच सुचत नव्हते. तातडीने कोणती पावले उचलली पाहीजे व तातडीने काय केलं पाहिजे. डॅमेज रोखायचा कसा यावरच बराच वेळ गेला.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी बोलायला उशीर केला तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर मौन बाळगले. महायुतीमध्ये यावरून गोंधळाची परिस्थती दिसली. त्यामुळे जनतेत व विरोधी पक्षांत या संपूर्ण प्रकरणाचा रोष वाढत गेला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोकणामध्ये विरोधी पक्षाला आयता मुद्दा मिळाला आहे. त्यातच भ्रष्टाचाराचा मुद्दा हा विरोधी पक्षाच्या हाती लागला आहे.
लोकसभच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या हातून कोकण गेले. त्याचवेळी राणेंचा विजय झाला. त्यामुळे आता या मुद्यामुळे येत्या काळात ठाकरे गटाला पुन्हा याठिकाणी आक्रमक होत पॉवर रिगेन करता येईल का ? त्यामुळे ठाकरे गट आक्रमक होईल का ?
- या घटनेनंतर आदित्य ठाकरे कोकणात गेले त्याठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद लाभला. त्यांच्यासोबत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. कोकणामध्ये पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट पुन्हा आक्रमक झाला असल्याचे पहावयास मिळाले. राणे आणि आदित्य ठाकरे समोर आल्यानंतर जो प्रकार घडला संपूर्ण देशांनी पाहायला आहे. यामुळे कार्यकर्त्यांना नवे बळ मिळाले आहे. छत्रपती शिवरायांना हे लोक सॊडत नाहीत हे लक्षात आल्याने कोकण, मुंबई, ठाणे येथील शिवसेनेला बळ मिळाले आहे. या निमित्ताने विरोधी पक्षाला नवा मुद्दा मिळला आहे.
सध्या महायुतीमध्ये जे चालले आहे, शिंदे व फडणवीस एकत्रित आले. त्यानंतर अजित पवार आले, हे सर्व पहिले तर ही स्क्रिप्ट दिल्लीतून लिहली गेली असे म्हटले जाते त्यामुळे नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी या ठिकाणी यायचे व जनतेची माफी मागून निवडणूक जिंकून द्यायची असे प्रयत्न केला जात आहेत का ? सातत्याने नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याची राज्याला का गरज भासत आहे ?
- आतापर्यंतच्या निवडणूका पाहिल्यातर राज्यात स्वबळावर निवडून येण्याची खात्री भाजपला नाही. त्यामुळे त्यांनी शिंदे गटाला सोबत घेतले आहे. शिंदेंचा गट सॊबत घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. शिंदे सारखा मराठा चेहरा सोबत येऊनही फारसा फरक दिसत नसल्याने त्यानंतर अजितदादांचा प्रयोग झाला. त्यांना सोबत घेतले गेले. अजितदादा सोबत आल्यानंतर लोकसभा निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही, उलट महायुतीला फटका बसला. अपेक्षित यश भाजपला मिळाले नाही. त्यानंतर लाडकी बहीण योजना आणली. त्याचा दिलासा मिळेल असे वाटत असतानाच तीन पक्षांना अपॆक्षित यश मिळत नाही. त्यातून चुका घडत असून त्यानंतर नरेंद्र मोदींना महाराष्ट्र्रात येऊन माफी मागावी लागत आहे.
लोकसभा निवडणुकीत कांदाप्रश्न गाजला. यावेळी दिंडोरीच्या नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गोंधळ घातला होता. त्यामधून त्यांना विरोध झाल्याचे पाहायला मिळाले ? येत्या काळात राज्यातील जनता मोदींना स्वीकारेल का प्रश्न महत्वाचा आहे ? मोदी लाट राज्यात आज ही आहे का ?
- लोकसभा निवडणुकीत मोदींच्या सभांना मिळणारा प्रतिसाद कमी झाल्याचा पाहावयास मिळाला आहे. निकालामधूनही मोदींचा करिष्मा कमी झाल्याचे जाणवत आहे. काही ठिकाणचा अपवाद वगळता सभा झालेल्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. मोदींचा पाच वर्षापूर्वी असलेला प्रभाव कमी झाला आहे. महाविकास आघाडीची शरद पवार यांनी जी मोट बांधली आहे. त्यामुळे आघाडीला यश मिळत आहे.
महायुतीसमोरील आव्हाने वाढत आहेत? विधानसभेचे उमेदवार पळवले जात असल्याने त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे का ?
-येत्या काळात आव्हान असणार असल्यानेच नरेंद्र मोदींना हे पाऊल उचलावे लागले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे काँग्रेस पुन्हा एकदा सर्वजण सक्रिय झाले आहेत. मविआ आक्रमक झाली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या चुका मोठया प्रमाणात पुढे येत आहेत. त्यांच्या चुका मविआकडून पुढे आणल्या जात आहेत. मात्र हे डॅमेज कंट्रोल रोखताना सरकारमध्ये संभ्रम दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत ही फाईट जोरात दिसेल.
मध्यप्रदेशप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा परिणाम महाराष्ट्रात जाणवेल का ? त्याचा फायदा राज्यातील महायुती सरकारला होणार का ?
- राज्यातील जनतेचा स्वभाव पाहता कोणत्याही लोकप्रिय योजनेला राज्यातील जनता भुलत नाही. येथील मतदार सुज्ञ व जागरूक आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कुठली तरी योजना येते. त्यामुळे ही योजना किती काळ टिकेल की टिकणार नाही हे माहित नाही. त्याचे भविष्य काय असणार हे माहित नाही ? त्यामुळे हेच मतदारांना समजाविण्याचे काम विरोधी पक्ष सातत्याने करीत आहे.
हे निवडणुकीसाठी दाखवलेले आमिष आहे. त्याला भुलून जाऊ नका, असे सांगितले जात आहे. त्याच्या पुढेही जाऊन लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी सत्ताधारी व विरोधी पक्षाने जोडले आहेत. त्यामुळे ही योजना घरापर्यंत कोण आणली, त्याला फायदा होणार आहे. महायुतीपुढील संकटाचा सामना वाढत असताना ही येणाऱ्या काळात होत असलेली निवडणूक मोठी रंगतदार ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.