Basavraj Patil, Abhimanyu Pawar Sarkarnama
मराठवाडा

Abhimanyu Pawar : अभिमन्यू पवार घाईघाईत बसवराज पाटलांच्या भेटीला गेले; खरं कारण आलं समोर

सरकारनामा ब्यूरो

जलील पठाण

Latur Political News : पाच दिवसापूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी मंत्री बसवराज पाटील यांचे शुक्रवारी (ता. 1) उमरग्यात आगमन झाले. काँग्रेसचे माजी मंत्री आणि दोनवेळा औसा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले बसवराज पाटील हे काँग्रेसमधील मोठे नेते. त्यांच्या भाजप प्रवेशाने धाराशिव आणि लातूर जिल्ह्याच्या राजकारणातील समीकरणे बदलणार अशी चर्चा सुरू आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत औसा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी देण्यात येईल, असा शब्द बसवराज यांना देण्यात आल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय.

अशावेळी विद्यमान आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी बसवराज पाटील औसा मतदारसंघात येण्याची वाट न पाहता थेट त्यांचे गाव मुरुम गाठले. दीडशेहून अधिक गाड्यांचा ताफा आणि शेकडो कार्यकर्ते सोबत घेऊन पवार बसवराज पाटलांचे स्वागत करण्यासाठी मुरुममध्ये गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. पण आता त्यांच्या या घाईघाईच्या भेटीचे कारण समोर आले आहे.

बसवराज पाटील (Basavraj Patil) यांच्या भाजप प्रवेशामुळे आपल्या उमेदवारीला कोणताही धोका नाही. शिवाय पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देताना विधानसभा उमेदवारीचा कुठलाही शब्द राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी दिलेला नाही, हे अगदी बसवराज पाटील यांच्या तोंडावर आणि त्यांच्याच स्वागत कार्यक्रमात सांगून अभिमन्यू पवार यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बसवराज पाटील यांच्या समर्थकांमध्ये पवारांच्या या खुलाशानंतर चर्चा सुरू झाली आहे. मुरुम येथे जाऊन बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाने आपल्या विधानसभा उमेदवारी किंवा राजकारणावर कुठलाच परिणाम होणार नाही, हे भासवण्याचा प्रयत्न अभिमन्यू पवार यांनी आपल्या शेकडो समर्थकांनासोबत नेत केला.

बसवराज पाटील हे भाजपात कुठलीही अट ठेवून आलेले नाहीत. तर पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला विचारले होते की, तुला याचा काही त्रास तर होणार नाही ना? यावर मी त्यांना म्हणालो, की मला त्यांचा अजिबात त्रास होणार नाही. उलट मला त्यांची मदतच होईल. यावर होकारार्थी मान हलवून बसवराज पाटलांनीही पवारांच्या बोलण्याला दुजोरा दिला होता, हे सांगायलाही पवार विसरले नाहीत.

बसवराज पाटील यांना अभिमन्यू पवारांची ही खेळी लक्षात आली नसेल तर नवलच. 35-40 वर्षे काँग्रेसमध्ये काम केलेले बसवराज पाटील हे कच्च्या गुरुचे चेले नाहीत. त्यामुळे योग्य वेळ येताच तेही अभिमन्यू पवारांना प्रत्युत्तर देतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अभिमन्यू पवार यांनीच तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या बसवराज पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला होता.

आतापर्यंत सातवेळा या मतदारसंघातून काँग्रेसने (Congress) विजय मिळवलेला आहे. पैकी दोनदा बसवराज पाटील काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. परंतु गेल्या निवडणुकीत पहिल्यादांच मैदानात उतरलेल्या भाजपच्या अभिमन्यू पवार यांनी त्यांच्यावर तब्बल 26 हजार 700 मतांनी विजय मिळवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अभिमन्यू पवार यांचे गेल्या पाच वर्षातील मतदारसंघ आणि जिल्ह्यातील राजकारण पाहिले तर ते धूर्त राजकारणी असल्याचे दिसून आले आहे.

माजी मंत्री संभाजी पाटील निंलगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर असलेला प्रभाव त्यांनी आपल्या धूर्त राजकारणातूनच कमी केला. आता बसवराज पाटील भाजपमध्ये आल्याने निलंगेकर त्यांच्या मदतीने अभिमन्यू पवारांना खो देण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात औसा आणि लातूर जिल्ह्याचे राजकारण कोणत्या दिशेला जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT