Marathwada Politics : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप महायुतीच्या परिवर्तन पॅनलचे पाच संचालक निवडून आल्याचा दावा केला गेला. भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्या बिनविरोध संचालक झालेल्या पत्नी शोभा पवार आमच्याच, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बसवराज पाटील छातीठोकपणे सांगत होते.
तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सहकार पॅनलने विजयी झालेल्या पंधरा संचालकांच्या यादीमध्ये शोभा पवार यांचे नाव समाविष्ट करत त्या आमच्याच पॅनलच्या, असा दावा केला.
शोभा पवार या काँग्रेस नेते धीरज देशमुखांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लढलेल्या सहकार पॅनलच्याच असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित संचालक अरविंद पाटील निलंगेकर, ऋषीकेश कराड, अतुल गंभीरे, भगवान पाटील तळेगांवकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
यामध्ये शोभा पवार यांच्या अनुपस्थितीने त्या सहकार पॅनलच्याच असल्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे आमदार अभिमन्यू पवार मात्र या नवनिर्वाचित संचालक मंडळासोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आवर्जून हजर होते.
लातूर जिल्हा बँकेत परिवर्तन पॅनलचे पाच संचालक निवडून आल्याचा दावा करत अरविंद पाटील निलंगेकर यांनी सत्ताधारी सहकार पॅनल आणि त्याचे सर्वेसर्वा धीरज देशमुख, आमदार अमित देशमुख, माजी मंत्री दिलीपरावर देशमुख यांना आव्हान दिले होते. तुमची देशमुखशाही संपवण्यासाठी आम्ही पाच संचालक पुरेसे आहोत, तुमच्या भ्रष्ट कारभारावर आम्ही अंकूश ठेवू, असा इशारा निलंगेकर यांनी विजयानंतरच्या प्रतिक्रियेतून दिला होता. मात्र परिवर्तन पॅनलकडे पाच नाही तर चारच संचालक असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भेटीनंतर स्पष्ट झाले आहे.
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीत फूट पडली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी वेगळी भूमिका घेत काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. बाबासाहेब पाटील यांनी उघड भूमिका घेतली तर अभिमन्यू पवार यांनी पडद्यामागे तडजोडी केल्याची चर्चा आहे. यातूनच शोभा पवार यांची बँकेच्या संचालक पदावर बिनविरोध निवड झाल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे संपूर्ण निवडणूक काळात अभिमन्यू पवार हे ना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या व्यासपीठावर दिसले, ना भाजपाच्या परिवर्तन पॅनलच्या.
दोन्ही पॅनलने शोभा पवार या आमच्याच संचालक असल्याचा दावा केल्यानंतरही अभिमन्यू पवार किंवा स्वतः शोभा पवार यांनी या संदर्भात कुठलीही भूमिका समोर येऊन मांडली नाही. आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या संचालकांसोबत देखील त्या नव्हत्या. अभिमन्यू पवार यांची उपस्थिती ही शोभा पवार यांचे प्रतिनिधी म्हणून भासवण्याचा प्रयत्न झाला असला तरी यातून संभ्रमावस्था कायम दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.