Marathwada politics News: लातूर जिल्हा बँकेत राजकारण आणायचे नाही, ही सहकाराची निवडणूक आहे, शेतकऱ्यांची बँक आहे असे छातीठोकपणे भाषणांतून सांगणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत सहकाराच्या नावाखाली नात्यागोत्यांचा स्वाहाकार सुरू केल्याचे पाहायला मिळाले. पत्नी, मुलगा, मुलगी, जावई यांचे उमेदवारी अर्ज दाखल करत जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी इथेही सत्ता आपल्याच हाती असली पाहिजे असा अट्टाहास कायम ठेवल्याचे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनी कुटुंबीयांना पुढे केल्याचे चित्र दिसून आले. काँग्रेस, महायुती अशा दोन्हीही पक्षांनी आपापल्या राजकीय वारसांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मराठवाड्यासह राज्यात झालेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुकीमध्ये सहकार क्षेत्रातील घराणेशाहीचा हा पॅटर्न सर्वत्र दिसून आला.
त्याला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही अपवाद ठरली नाही. काँग्रेसकडून विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासह दिलीप पाटील, सर्जेराव मोरे, माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे सुपुत्र अशोक निलंगेकर, त्यांच्या सुनबाई संगीता यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दहा वर्ष संचालकपदी राहिल्यामुळे बाबासाहेब पाटील यांना नियमानुसार संचालक मंडळाची निवडणूक लढवण्यास मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र यावर सहकार मंत्र्यांनी आपले जावई हेमंत जाधव यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांचे पुत्र अविनाश जाधव आणि दिवंगत माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या कन्या प्रीती भोसले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
लातूर जिल्हा बँकेच्या राजकारणात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय संघर्षाचा भडका उडाला आहे. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप यामुळे ही निवडणूक चर्चेत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी प्रमाणेच महायुतीतही लातूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात आपल्या घरातील नातेवाईकाची वर्णी लावण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड यांच्यासह त्यांचे पुत्र ऋषिकेश कराड, आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार, माजी मंत्री विनायकराव पाटील यांची कन्या अबोली पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय अभिमन्यू पवार यांचे निकटवर्तीय सुहास पाचपुते, संतोष बेंबडे, बाबुराव खंदारे, भीमाशंकर राचटे आणि भगवान पाटील हेही रिंगणात उतरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.